SSC HSC Exam : दहावी-बारावीच्या वर्षातून दोनदा परीक्षा; राज्यात ‘या’ वर्षांपासून होणार अंमलबजावणी

SSC HSC Exam : दहावी-बारावीच्या वर्षातून दोनदा परीक्षा; राज्यात ‘या’ वर्षांपासून होणार अंमलबजावणी
पुणे : राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) जाहीर केलेल्या धोरणानुसार, दहावी आणि बारावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी राज्यात 2026 पासून होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2024 च्या दहावी-बारावीच्या परीक्षा प्रचलित पध्दतीने होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर 2025 ला संबंधित परीक्षा प्रचलित पध्दतीनेच होणार असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली आहे.
एनसीईआरटीने एप्रिलमध्ये शालेय शिक्षणाच्या आराखड्याचा मसुदा जाहीर केला होता. त्यावर हरकती सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर आता अंतिम आराखडा जाहीर करण्यात आला आहे. नव्या आराखड्यानुसार येत्या काळात सर्व शिक्षण मंडळांनी सत्र पद्धतीचा अवलंब करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना विषयाचा अभ्यास पूर्ण झाल्यावर लगेच परीक्षा देता येईल. त्यामुळे एका परीक्षेतून मूल्यमापन होण्याचा ताण कमी होईल, असे नमूद करण्यात आले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाव्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळेल. मूल्यमापनात कोणतीही तडजोड न करता दहावी-बारावीच्या परीक्षा सोप्या कराव्यात. वर्षातून दोनवेळा परीक्षा घेण्यासाठी सर्वसमावेशक प्रश्नसंच आणि सुयोग्य सॉफ्टवेअर तयार करता येईल, असेही आराखड्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षातून दोन परीक्षा घ्यायच्या असतील तर त्यासाठी अगोदर पाठ्यक्रम तयार करावा लागणार आहे. तसेच संबंधित नवीन पाठ्यपुस्तके तयार करून विद्यार्थ्यांना देणे आणि नव्या परीक्षासंदर्भात विद्यार्थ्यांचा सराव करावा लागणार आहे. त्यासाठी अंमलबजावणी अगोदर नववी आणि अकरावीला करून मगच दहावी-बारावीला करता येणार आहे. त्यामुळे संबंधित बदल करायचा असला, तर तो 2025 ला अगोदर नववी आणि अकरावीला होईल आणि मगच 2026 ला हा बदल दहावी-बारावीला करणे शक्य होणार आहे.
राज्य मंडळाकडून आधीपासूनच दोन संधी
2015 पासून राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारच्या माध्यमातून दोन संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना
श्रेणीसुधारच्या माध्यमातून गुण वाढविण्याची संधी असते. त्यामुळे राज्य मंडळाला एनसीईआरटीच्या नव्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची तशी आवश्यकताच नाही; परंतु परीक्षा पध्दतीत बदल झाला आणि गुणांचे स्वरूप बदलले, तर मात्र राज्य मंडळाला नव्या धोरणानुसार परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
राज्य मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षा 2024 मध्ये तरी प्रचलित पध्दतीनेच होणार आहे. तसे मंडळाने जाहीरदेखील केले आहे. 2025 मध्ये परीक्षा पध्दतीमध्ये काही बदल करण्याचे निर्देश सरकारने दिले तर त्या पध्दतीने परीक्षा पध्दतीमध्ये बदल करण्याची राज्य मंडळाची तयारी असणार आहे.
– शरद गोसावी, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news