पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण ११.६० टक्क्यांवर

पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण ११.६० टक्क्यांवर

कोल्हापूर : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 11.60 टक्क्क्यापर्यंत गेले आहे. यापूर्वी हे प्रमाण 11 टक्क्यावर होते. त्यामध्ये आता 0.60 टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2025 पर्यंत इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 20 टक्क्यांवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इथेनॉल पेट्रोलमध्ये टप्प्याटप्याने वाढवले जात आहे.

केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांपासून इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इथेनॉल उत्पादनासाठी साखर कारखाने व खासगी उद्योजक यांना प्रोत्साहित केले आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी झाला. त्याचा परिणाम उसाच्या वाढीवर होऊन उत्पादनात घट झाली आहे. यामुळे साखर उत्पादनात घट होणार असा अंदाज करून केंद्र सरकारने साखर उत्पादनाला प्राधान्य देत साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यावर निर्बंध आणले आहेत. यामुळे साखरेवर आधारित देशातील सुमारे 150 पेक्षा अधिक प्रकल्पांतून 136 कोटी लिटरपैकी 101 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन करून त्याचा पुरवठा तेल कंपन्यांना केला आहे.

सध्या साखर हंगाम संपत आल्यामुळे साखरेवर आधारित इथेनॉल उत्पादन कमी होणार असल्याने केंद्र सरकारने धान्यापासून इथेनॉल उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. या इथेनॉलचा 14 कोटी लिटरचा करार झाला आहे. प्रत्यक्षात 4 कोटी लिटरचाच पुरवठा झाल्याचे सांगितले जात आहे. या विभागातही इथेनॉल उत्पादनात घट झाली आहे.

तेल कंपन्यांनी यावर्षी इथेनॉलचे 298 कोटी लिटरचे करार केले आहेत. साखरेवर आधारित आणि धान्यापासून इथेनॉल उत्पादन करणारे प्रकल्प यातून नोव्हेंबर 2023 ते फेब—ुवारी 2024 या कालावधीत 169 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे. तेल कंपन्यांनी केलेल्या करारानुसार 129 कोटी लिटर इथेनॉलचे कमी उत्पादन झाले आहे. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला आहे. राज्यातील 40 कारखाने बंद झाले आहेत. यामुळे पुढील काळात साखरेपासून कमी आणि धान्यापासून काही प्रमाणात इथेनॉल उत्पादन होईल. पण मिश्रणासाठी इथेनॉल उत्पादनाची जी गती हवी होती, ती मिळताना दिसत नाही. यामुळे इथेनॉल उत्पादन कमी होत आहे. यामुळे तेल कंपन्या पुढील काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.

राज्यात 15 मार्चपर्यंत 100 लाख मे. टन साखर उत्पादन झाले आहे. अद्याप 164 कारखाने सुरू असल्याने उत्पादन वाढणार आहे. वाढणार्‍या उत्पादनाचा विचार करता साखरेचे दर 3,350 ते 3,400 प्रतिक्विंटल स्थिर आहेत. जर शेतकर्‍याला त्याच्या उसाची एफआरपी लवकर हवी असेल तर इथेनॅाल निर्मितीवरील बंधन शिथिल करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उत्पादन वाढीच्या प्रमाणात साखर निर्यातीला परवानगी मिळावी.
– पी. जी. मेढे, साखर उद्येाग तज्ज्ञ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news