व्हेल माशाच्या उलटी संदर्भात शास्त्रोक्त माहिती संकलित करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना

व्हेल माशाची उलटी
व्हेल माशाची उलटी

मालवण; पुढारी वृत्तसेवा : व्हेल माशाच्या उलटी संदर्भात शास्त्रोक्त माहिती संकलित करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी मत्स्य, वन व संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती अंबरग्रीस अभ्यास गट समन्वयक रविकिरण तोरसकर यांनी दिली.

गेल्या काही वर्षांमध्ये व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबरग्रीस सापडण्याचे प्रकार वाढले आहेत. कथित तस्करीबद्दल मच्छिमार तसेच किनारपट्टीतल्या भागातील लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. व्हेल माशाच्या उलटी संदर्भात प्रशासन, मच्छिमार आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात समज, गैरसमज आहेत. आजही व्हेल माशाची उलटीबाबत सत्यता तपासणारी यंत्रणा नाही किंवा त्या यंत्रणेला मर्यादा आहेत. यामुळे कायद्याचा दुरुपयोग तसेच तस्करी संदर्भात गोष्टी घडत असतात.

अंबरग्रीस हे स्पर्म व्हेल माशापासून उत्पन्न होते. अशी प्राथमिक माहिती उपलब्ध आहे. स्पर्म व्हेल हा वन्यजीव प्राणी कायदा संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत येत असल्यामुळे त्याची उलटी अथवा शरीरातून उत्सर्जित होणारा पदार्थ हा पण संरक्षित केला गेला आहे. तो संरक्षित असावा की नसावा याबाबत तज्ज्ञांमध्ये आणि सर्वसामान्य माणसांमध्ये मत मतांतरे आहेत. यासाठीच व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबरग्रीस या पदार्थाचा सखोल आणि शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य, वन, संशोधन, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांनी एक अभ्यास गट स्थापन केला आहे.

अभ्यास करताना मच्छिमार, पारंपरिक ज्ञानाचा पण वापर केला जाणार आहे. तसेच विविध महाविद्यालयामधील संशोधक व विद्यार्थ्यांनी या संदर्भात कोणाकडे काही संशोधन, साहित्य अथवा पारंपरिक ज्ञान असेल त्यांनी संपर्क साधावा असे आवाहनही श्री. तोरसकर यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news