आरोग्‍य : संसर्गजन्य आजारांचा उद्रेक

आरोग्‍य : संसर्गजन्य आजारांचा उद्रेक
Published on
Updated on

संपूर्ण देशभरात सध्या डोळे येण्याच्या साथीचा फैलाव वेगाने होत आहे. एकट्या महाराष्ट्रात या समस्येने ग्रस्त रुग्णांची संख्या दीड लाखाहून अधिक झाली आहे. जगभरात कंजेक्टिव्हायटिस किंवा आय फ्लू या आजाराने ग्रस्त रुग्ण आढळतात. कोरोना महामारीमुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे या आजारांचा सामना करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

गेल्या जवळपास महिन्याभरापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात संसर्गजन्य आजारांच्या साथीत डोळे येण्याच्या आजारात प्रचंड वाढ झाली आहे. काही अभ्यासकांच्या मते, यापूर्वी इतकी रुग्णसंख्या कधीही पाहण्यात आली नव्हती. देशातील जवळपास अर्धा डझन राज्यांना संसर्गजन्य आजारांच्या वाढत्या प्रकोपामुळे मार्गदर्शक सूचना जारी कराव्या लागल्या आहेत.

अलीकडच्या काळात आय फ्लू किंवा किंवा कंजेक्टिव्हायटिस म्हणजेच डोळे येण्याची साथ ही एक जागतिक आरोग्य चिंता ठरली आहे. एका आकडेवारीनुसार, जगभरात या आजारांवरील उपचारांच्या औषधांची उलाढाल चार अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. यावरून या साथीची व्यापकता लक्षात येते. जगातील सर्वच बड्या देशांमधील मोठ्या संख्येने लोक डोळ्यांच्या आजाराने ग्रस्त आहेत. हा संसर्ग पसरतो तेव्हा डोळे लालबुंद होतात. प्रचंड खाज सुटते आणि डोळ्यांतून सतत पाणी वाहत राहते. काहींच्या डोळ्यांतून पू सारखा चिकट द्रवपदार्थ बाहेर पडतो. काहींचे डोळे भीतीदायक वाटावे असे सुजतात. दिवसभर सतत डोळ्यांमध्ये काही तरी गेल्यासारखे वाटत राहते. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा आजार रुग्णाला जवळपास आठवडाभर बेजार करतो, असे दिसून आले आहे.

हा आजार होण्यास विशिष्ट असे एकच कारण नाही. यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. व्हायरल, बॅक्टेरियल संसर्ग, अ‍ॅलर्जी आणि जळजळ निर्माण करणार्‍या पदार्थाच्या संपर्कात आल्यानेदेखील डोळे येऊ शकतात. एवढेच नाही, तर बाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यानेदेखील हा आजार पसरतो. गर्दीच्या ठिकाणी, कार्यालयातील सहकारी, शाळेतील मुले यांच्यात डोळ्यांची साथ पसरण्याची शक्यता अधिकच राहते.

कोरोना महामारीसारख्या साथीचा सामना केल्यामुळे नागरिकांमध्ये संसर्गजन्य किंवा साथीच्या रोगांचा सामना करण्याबाबत किंवा त्यापासून स्वतःचा बचाव करण्याबाबत जागरूकपणा विकसित झाला आहे. त्यामुळे डोळे येण्याच्या साथीच्या प्रसाराला काही प्रमाणात अटकाव बसला आहे, ही वस्तुस्थिती आहे; परंतु दुसरीकडे डोळे आल्याचे रुग्णाला आणि इतरांना चटकन लक्षात येत नसल्यामुळे जंतुसंसर्गाचा फैलाव वेगाने होत आहे. मुळात, यापूर्वी अनेकदा डोळे येण्याची साथ येऊन गेलेली आहे. त्यामुळे कोरोना साथीप्रमाणेच अनेक जण यावर नाना तर्‍हेचे उपाय करताना दिसताहेत. परंतु, वैद्यकीय सल्ल्याशिवाय असे उपाय करणे धोक्याचे ठरू शकते.

उदाहरणच घ्यायचे झाल्यास डोळे आल्यानंतरच्या वेदना कमी करण्यासाठी काही जण स्टेरॉईडचा वापर करतात. मात्र, दीर्घकाळ त्याचा वापर झाल्यास त्याचा डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळे आल्यानंतर वैद्यकीय मार्गदर्शनानुसारच उपाय करावेत. यामध्ये स्वच्छ पाण्याने, कोमट पाण्याने डोळे सतत स्वच्छ करणे, इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादींचा वापर न करणे, सतत डोळे न चोळणे, नियमित हात धुणे, घराबाहेर जाताना गॉगल आवर्जून वापरणे, संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्ररागतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करणे, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे यासारख्या उपायांचा समावेश होतो.

पावसाळ्याच्या दिवसांत डोळे येण्याच्या साथीबरोबरच अन्यही काही आजार डोके वर काढताना दिसतात. गेल्या काही दिवसांत देशातील अनेक भागांत चांगली पर्जन्यवृष्टी झाली आहे. या पावसामुळे बर्‍याच भागांत अस्वच्छता वाढली आहे. अतिआर्द्रतेचे वातावरण आजारांचा फैलाव होण्यास पोषक असते. कोरोना काळानंतर लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजार बळावण्याची शक्यता वाढली आहे. उदाहरणार्थ, गेल्या काही महिन्यांमध्ये डेंग्यूचा प्रसार वाढताना दिसत आहे.

देशातील एकट्या त्रिपुरासारख्या राज्यात 180 पेक्षा अधिक रुग्ण नोंदले गेले आहेत. त्याचवेळी दिल्लीत 2018 नंतर सर्वाधिक रुग्ण पाहावयास मिळत आहेत. या महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत दिल्लीत डेंग्यूचे एकशे पाच रुग्ण आढळून आले आहेत. दररोज सरासरी 21 नवीन रुग्ण या आजाराच्या विळख्यात येत आहेत. ही आकडेवारी दिल्ली महानगरपालिकेच्या अहवालात नोंदवलेल्या माहितीवर आधारित आहे. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त लोक डेंग्यूच्या विळख्यात आले आहेत. याहून चिंतेची बाब म्हणजे, डेंग्यूने ग्रस्त रुग्णांपैकी किमान निम्मे रुग्ण सरकारी रुग्णालयात किंवा खासगी दवाखान्यात दाखल होतात. महाराष्ट्रातही डेंग्यूचा प्रकोप वाढतो आहे. विदर्भात या आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. 1 जानेवारी ते 7 ऑगस्ट 2023 दरम्यान विदर्भात डेंग्यूचे 465 रुग्ण आढळले. त्यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण गेल्या दीड महिन्यातील आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण नागपूर शहर आणि गडचिरोलीत आहेत.

डेंग्यू हा जीवघेणा आजार आहे आणि त्यामुळे अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. या आजारामागचे कारण म्हणजे साचणारे पाणी आणि डासांची होणारी उत्पत्ती. हा आजार पावसाळ्यात वाढतो, असे गेल्या काही वर्षांत दिसून आले आहे. डेंग्यूंच्या रुग्णांना तीव्र डोकेदुखी होते आणि डोळे दुखणे, अस्वस्थ वाटणे यासारखे त्रास जाणवतात. स्नायू आणि सांधेदुखीमुळे होणार्‍या डेंग्यूला हाड मोडणारा ताप असेही म्हटले जाते. डेंग्यूची लागण झाल्यानंतर निष्काळजीपणा जीवावर बेतणारा ठरू शकतो. रक्तातील प्लेटलेटस्ची संख्या वाढवण्यासाठी शीघ्र उपचार होणे गरजेचे असते. डेंग्यूपासून बचावासाठी परिसरात स्वच्छता ठेवणे आणि डास होऊ न देणे आवश्यक आहे. एखाद्या प्रदेशात विशिष्ट आजाराचा उद्भव नेहमीच्या अपेक्षित प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास साथ आली असे समजले जाते. अठराव्या शतकात सूक्ष्मजंतू आणि त्यांच्यामुळे होणारे संसर्गजन्य (संक्रामणजन्य) रोग यांची माहिती मिळू लागल्यावर 'साथीचे आजार' हा शब्दप्रयोग मुख्यतः तीव्र संक्रामणजन्य विकारांच्या संदर्भात प्रचारात आला, अशी माहिती आढळते.

साथीच्या आजारांमध्ये मृत्युमुखी पडणार्‍यांचे प्रमाण मोठे असते. वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे या आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असले, तरी त्याबाबत आजही नागरिकांमध्ये प्रबोधनाची गरज आहे. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचे सक्षमीकरणही गरजेचे आहे. उपचारांचा खर्च कमी करणे, मोफत उपचार करणे यासारखे निर्णय स्वागतार्हच आहेत; परंतु देशातील अनेक दुर्गम भागांत, गावखेड्यांत आरोग्य सुविधाच नसतील, सरकारी किंवा खासगी रुग्णालयांत अद्ययावत उपचारांची सुविधाच नसेल, तर रुग्णांचे हाल होतात, प्रसंगी प्राण गमवावे लागतात. बदलत्या हवामानाच्या काळात, जागतिक तापमानवाढीच्या काळात विविध आजार डोके वर काढताहेत. त्यांचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करून त्यांची व्यापकता वाढवणे क्रमप्राप्त ठरते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news