PF Interest Rate : पीएफवरील व्याजदरात घट, केंद्राचा नोकरदारांना दे धक्का!

PF Interest Rate : पीएफवरील व्याजदरात घट, केंद्राचा नोकरदारांना दे धक्का!

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्‍या (PF) ठेवींवरील व्याजदर (PF Interest Rate) वाढण्याची प्रतीक्षा करत असणार्‍या नोकरदारांना मोठा फटका बसला आहे. 'ईपीएफओ'ने (EPFO) व्याजदर वाढवण्याऐवजी कमी केला आहे. 'ईपीएफओ'च्या बैठकीत पीएफचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोनदिवसीय बैठक शुक्रवार, ११ मार्चपासून सुरू झाली, जी आज (दि. १२) संपली, ज्यामध्ये व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील सुमारे ६ कोटी कर्मचाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. (PF Interest Rate)

कर्मचारी भविष्‍य निर्वाह निधी संस्‍थेने ( ईफीएफओ)२०२१-२२ आर्थिक वर्षासाठी व्‍याजदर ८. १ टक्‍के राहणार असल्‍याची घोषणा केली आहे. जो २०२०-२१ मध्ये ८.५ टक्के होता. यंदाच्‍या आर्थिक वर्षासाठी जाहीर व्‍याजदर मागील दहा वर्षांमधील सर्वात कमी आहेत.  भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज चार दशकांच्या नीचांकी पातळीवर आले आहे.

२०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ८.१ टक्के व्याजदर जाहीर करण्यात आला आहे, १९७७-७८ नंतरचा हा सर्वात कमी व्याजदर आहे. त्यावेळी व्याजदर ८ टक्के करण्यात आला होता. (PF Interest Rate)

रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कमाईवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशा परिस्थितीत २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी पीएफच्या व्याजदरात कपातही केली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

आता सीबीटी (CBT)च्या निर्णयानंतर, २०२१-२२ साठी ईपीएफ ठेवीवरील व्याजदर संमतीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. सरकारने अर्थ मंत्रालयाद्वारे याची पुष्टी केल्यानंतरच ईपीएफओकडून ​​व्याजदराची अंमलबजावणी करण्यात येते. पीएफमधील व्याजदराच्या निर्णयासाठी वित्त गुंतवणूक आणि लेखापरीक्षण समितीची प्रथम बैठक होते. त्यात या आर्थिक वर्षात जमा झालेल्या पैशाचा हिशेब दिला जातो. यानंतर सीबीटीची बैठक होते. सीबीटीच्या निर्णयानंतर, अर्थ मंत्रालयाच्या संमतीनंतर व्याज दर लागू केला जातो. आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याजदर निश्चित केला जातो. (PF Interest Rate)

पीएफवर ३ % व्याज १९५२ मध्ये सुरू झाले…

१९५२ मध्ये पीएफवर फक्त ३ टक्के व्याज दिले जात होते, ते १९५५ पर्यंत तसेच कायम होते. त्यानंतर त्यात वाढ झाली. ते १९७२ मध्ये पहिल्यांदा ६ टक्के, १९८४ मध्ये १० टक्क्यांच्या वर पोहोचले. पीएफ धारकांसाठी १९८९ ते १९९९ हा सर्वोत्तम काळ होता. या दरम्यान पीएफवर १२ टक्के व्याज मिळत होते. त्यानंतर व्याजदरात घसरण सुरू झाली. १९९९ नंतर व्याजदर कधीही १० टक्क्यांच्या जवळ पोहोचला नाही. २००१ पासून ते ९.५० टक्क्यांच्या खाली राहिले आहे. गेल्या सात वर्षांपासून ते ८.५० टक्के किंवा त्याहून कमी आहे. (PF Interest Rate)

ईपीएफओने आर्थिक वर्ष २०२०-२१ आणि मागील आर्थिक वर्षात ८.५ टक्के व्याज निश्चित केले होते. यापूर्वी २०१८-१९, २०१७-१८ आणि २०१६-१७ मध्ये पीएफचा व्याजदर ८.६५ टक्के होता. २०१५-१६ मध्ये ८.८ टक्के, २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये ८.७५ टक्के व्याजदर होता. (PF Interest Rate)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news