पर्यावरण : संकटग्रस्त वन्यजीव

पर्यावरण : संकटग्रस्त वन्यजीव

'व्हॅनिशिंग स्पेसीज' या पुस्तकाचे लेखक रोमाँ ग्रे म्हणतात, निसर्गमातेचा कोणीही 'खास लाडका' नाही! आपल्या वैज्ञानिक व तांत्रिक विकासाबरोबर जर आपण आपल्या वन्य जीवांचा नाश होऊ दिला, तर आपले स्वतःचे अस्तित्व संकटात येईल. इतर हजारो प्रजाती यापूर्वी लुप्त झाल्या, त्याचप्रमाणे एखाद्या दिवशी आपणही लुप्त होऊ शकतो. आजपासून (दि. 1) 'वन्यजीव सप्ताह' साजरा होत आहे. त्यानिमित्ताने…

गेल्या मार्चमध्ये मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांचेे पुनर्वसन करण्यात आले. तर जगप्रसिद्ध ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यात माहितीपट विभागात 'इलेफंट व्हिस्परर्स' या चित्रफितीस गौरविण्यात आले. या दोन्ही घटना भारतीय वन्य जीवन व वन्यजीव प्रेमींसाठी महत्त्वाच्या ठरल्या. चित्ता हा प्राणी सत्तर वर्षांपूर्वी भारतातून नष्ट (Extinction) झाला होता. आताच्या छत्तीसगड राज्यात 1947 साली महाराज प्रतापसिंह देव यांनी शेवटच्या चित्त्याची शिकार केली होती! त्यानंतर 1952 साली भारत सरकारने चित्ता भारतातून नामशेष (Extinct) झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले होते.

केंद्र शासनाने 2010 सालापासून चित्ता भारतात पुन्हा आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू केले होते. आणि तेरा वर्षांनंतर नामिबियातून चित्ते आणण्यात आले. अर्थात, या चित्ता प्रकल्पाबाबत देशात आणि परदेशात बरीच चर्चा होते आहे. परंतु या घटनेच्या निमित्ताने भारताच्या अत्यंत संपन्न आणि वैविध्यपूर्ण अशा वन्यजीवांपैकी एखादी प्रजाती नष्ट झाल्यास पुन्हा नैसर्गिकरित्या पुनर्वसन करणे किती कठीण आहे, याचा धडा मिळाला आहे. देशातील दुर्मीळ आणि संकटग्रस्त वन्यजीव प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहेत, हेच यातून दिसून येते.

भारताला अत्यंत समृद्ध नैसर्गिक वारसा लाभला आहे. वन्य जीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारे विविध प्रकारचे नैसर्गिक अधिवास आपल्याकडे आहेत. आज जगातील जैवविविधतेचे जे 'हॉट स्पॉट' आहेत, त्यापैकी दोन भारतात आहेत. ते म्हणजे, म्यानमारपर्यंतचा ईशान्य हिमालय आणि पश्चिम घाट! परंतु आज तेथील अनेक सस्तन प्राणी, उभयचर प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सर्वाधिक जैवविविधतेच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशाच्या द़ृष्टीने हे चिंताजनक आहे. हवामानबदल आणि तापमान वाढीमुळे देशात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि त्यातून मार्ग कसा काढावा, हा सरकारपुढे प्रश्न आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे गावे, शहरे कमी पडत चालली आहेत. माणूस जंगलांमध्ये शिरला आहे आणि जंगलच उरलेले नसल्यामुळे, वन्य प्राणी माणसांच्या वसाहतींमध्ये शिरत आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने अनेक वन्य प्रजातींचे अधिवास घटत चालले आहेत. जंगलातून जाणारे महामार्ग, रेल्वेमार्ग वन्य प्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत; तर जंगलातील औद्योगिक प्रकल्प, खाणी, रिझॉटर्स यांमुळे प्राण्यांचा एकांत व सुरक्षितता नष्ट झाली आहे.

कायद्याने बंदी असली तरी अनेक ठिकाणी वन्य जीवांची शिकार केली जाते. या सर्व कारणांमुळे अनेक वन्यप्रजाती दुर्मीळ आणि संकटग्रस्त झाल्या आहेत. 'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस' (IUCN) च्या अहवालानुसार, भारतातील सस्तन प्राण्यांच्या 81, पक्ष्यांच्या 38 आणि उभयचर प्राण्यांच्या 18 जाती संकटग्रस्त आहेत. यापैकी स्लेंडर लोरिस, सिंहपुच्छ मॅकॉक, स्नो लेपर्ड, क्लाऊडेड लेपर्ड, हुलूक गिबन, आशियाई सिंह, तिबेटीयन गॅझल, हिमालयीत तपकिरी अस्वले, एकशिंगी गेंडा, कस्तुरीमृग, निलगिरी ताहर, हिमालयन ताहर, आयबेक्स (Ibex) मार्खोर हे प्राणी तर अतिसंकटग्रस्त झाले आहेत.

जगातील एकूण पक्ष्यांच्या जातींपैकी चौदा टक्के, म्हणजे बाराशे पक्ष्यांच्या जाती भारतात आहेत. परंतु जंगलतोड, घटलेला अधिवास, प्रदूषण यामुळे अनेक पक्षी दुर्मीळ व संकटग्रस्त झाले आहेत. यापैकी शिंगचोचा, (Great fied Hombill) माळढोक, तणमोर, हिमालयन मोनल, ब्लू रॉबिन, वेस्टर्न ट्रॅगोपॅन, चिर तित्तर हे अतिसंकटग्रस्त असून त्यांच्या संरक्षणासाठी कठोर प्रयत्न ही आजची मोठी गरज आहे. त्याप्रमाणेच गंगेतील डॉल्फिन्स, चामड्याच्या पाठीचे कासव, घडियाल, ऑलिव्ह रिडले (समुद्री कासव), हिरवा समुद्र हे जलचर नामशेष होण्याचा धोका आहे. इतकेच काय, तर मोठ्या संख्येने कीटक नष्ट होत आहेत. 'अत्री' या संस्थेने पश्चिम घाटातील जैवविविधतेचा अभ्यास करून भुंग्यांच्या जातीतील कीटकांच्या प्रजाती कमालीच्या वेगाने नष्ट होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे नवनवीन विषाणू व जीवाणू उत्पन्न होत आहेत.

आज आपल्या अद्वितीय प्राणिसृष्टीतील अनेक प्राण्यांना त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे, हे अत्यंत विरोधाभासात्मक आहे. कारण आपल्या पूर्वजांनी वन्य प्राण्यांचा आदर आणि सहजीवनाचे तत्त्व पाळले होते! याचा प्रत्यय 'एलिफंट व्हिस्परर्स' या सत्यघटनेवर आधारित माहितीपटामुळे सर्वांना येतो आहे. आशिया खंडातील 60 टक्के हत्ती भारतीय जंगलामध्येच आहेत. पंरतु त्यांचे दोन तृतीयांश अधिवास क्षेत्र नष्ट झाले आहेत. हत्तींच्या स्थलांतराचा प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा व बिकट बनला आहे. 2002 साली महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगली हत्ती शेजारच्या गोवा-कर्नाटक राज्यांमधून आले. तर 2021 साली विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात ओरिसा आणि छत्तीसगडमधून हत्तींनी स्थलांतर केले आहे.

व्याघ्र कुळातील वाघ-सिंह आणि बिबट्यांनासुद्धा जगण्यासाठी भयावह परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. वाघांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी व्याघ्रप्रकल्पाबाहेरील वाघांच्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. तसेच व्याघ्रकेंद्रित पर्यटनाचे वन्य जीवनावर थेट दुष्परिणाम दिसून येत आहेत. भक्ष्याच्या शोधात बिबटे थेट शहरात येत आहेत. बिबट्यांचे अस्तित्व जंगलांपेक्षा मानवी वस्तीजवळ जास्त आहे. एके काळी उत्तर भारतात व मध्य भारतात मोठ्या संख्येने असणार्‍या आशियाई सिंहांचे गीरचे जंगल हे शेवटचे आश्रयस्थान आहे. तेथेही त्यांचा स्थानिक रहिवाशांबरोबर सतत संघर्ष सुरू आहे. आपले समृद्ध वन्यजीवन टिकवून निसर्गाचा समतोल राखणे, ही काळाची गरज बनली आहे.

सन 1970 पासून आजपर्यंत जगातील जीवनसृष्टी 52 टक्क्यांनी घटली आहे. आणि एकंदरीत पृथ्वीची वाटचाल ही सहाव्या मोठ्या प्रमाणावरील समूळ उच्चाटनाकडे (मास इक्स्टिंक्शन) होत आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाची व्याप्ती व विश्लेषण करणारी संस्था 'इंटर गव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेंट चेंज' (I.P.C.C.) च्या अहवालानुसार, भारत हे हवामान बदलामुळे परिणाम होणार्‍या सर्वाधिक असुरक्षित राष्ट्रांपैकी एक आहे. 'व्हॅनिशिंग स्पेसीज' या पुस्तकाचे लेखक रोमाँ ग्रे म्हणतात, निसर्गमातेचा कोणीही 'खास लाडका' नाही! आपल्या वैज्ञानिक व तांत्रिक विकासाबरोबर जर आपण आपल्या वन्य जीवांचा नाश होऊ दिला, तर आपले स्वतःचे अस्तित्व संकटात येईल. ज्याप्रमाणे इतर हजारो प्रजाती यापूर्वी लुप्त झाल्या, त्याचप्रमाणे एखाद्या दिवशी आपणही लुप्त होऊ शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news