पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या वेल्सला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. बिरसा मुंडा इंटरनॅशनल स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या या सामन्यात इंग्लंडने या नवख्या संघावर 5-0 गोलफरकाने दणदणीत विजयाची नोंद केली. निक पार्कने सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला गोल करून इंग्लिश संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लियाम अँसेल 28 आणि 37 व्या मिनिटला दोन गोल डागले. तर फिल रोपर 42 आणि निकोलस बॅंडरॅक 58 व्या मिनिटाला प्रत्येकी एक-एल गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
इंग्लंडने आक्रमक पवित्रा घेत 13 पेनल्टी कॉर्नर मिळवले. यापैकी दोन पेनल्टी कॉर्नरवर त्यांना वेल्सचे गोलजाळे भेदता आले. तर वेल्सला त्यांना मिळालेल्या चारपैकी एकाही पेनल्टी कॉर्नरवर गोल करता आला नाही. पार्कने सामन्याच्या 20 सेकंदात गोल करून इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. एक गोलने आघाडी घेत असताना, इंग्लंडने आक्रमण करणे थांबवले नाही आणि पहिल्या क्वार्टरच्या समाप्तीपूर्वी पेनल्टी कॉर्नर मिळवला. मात्र वेल्सच्या बचावफळीने त्यांना रोखले.
दुसरे क्वार्टर संपण्यापूर्वी इंग्लंडला एकूण चार पेनल्टी कॉर्नर मिळाले. यापैकी तीन वेल्सने रोखले. मात्र, अँसेलने अचूक फटका मारत चौथ्या पेनल्टी कॉर्नवर गोल नोंदवून इंग्लंडची आघाडी दुप्पट केली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर वेल्सने आक्रमक खेळी केली. 36 व्या मिनिटाला त्याने गोल करण्याचा प्रयत्न केला पण गोलरक्षकाच्या लांबूनच चेंडू नेटच्या बाहेर गेला. अँसेल आणि रोपर यांनी पुढील पाच मिनिटांत प्रत्येकी दोन गोल करून वेल्सच्या चिंतेत भर घातली.
चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीच्या तीन मिनिटांत दोन पेनल्टी कॉर्नरसह वेल्सने तीन वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु इंग्लंडचा गोलरक्षक ऑली पेनने त्यांचे हे आक्रमण हाणून पाडले. अखेरीस सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना बॅंडेरॅकने इंग्लंडचा पाचवा गोल करून आपल्या संघाचा मोठा विजय निश्चित केला.