Pulwama Attack : पुलवामा हल्‍ल्‍यानंतर फेसबुकवर ‘जल्‍लोष’ करणार्‍या विद्यार्थ्याला पाच वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पुलवामा दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर फेसबुकच्‍या माध्‍यमातून जल्‍लोष करणार्‍या इंजिनिअरिंगचा विद्यार्थी फैज रशीद याला बंगळूरमधील विशेष न्‍यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी त्‍याला पाच वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्‍यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे दशतवाद्‍यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या ( सीआरपीएफ ) बसवर आत्‍मघाती हल्‍ला केला होता. या हल्‍ल्‍यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्‍ल्‍यानंतर बंगळूरमधील कचरकनहल्‍ली येथील रहिवासी असलेला इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्‍या तिसर्‍या वर्षात शिकणार्‍या फैज रशीद याने फेसबुकवर या हल्‍ल्‍याचे समर्थन करणारी एक पोस्‍ट लिहिली होती. या पोस्‍टमध्‍ये त्‍याने जल्‍लोष केला होता. हल्‍ल्‍यानंतर तीन दिवसानंतर फैज याला अटक करण्‍यात आली होती. त्‍याचा फोनही जप्‍त करण्‍यात आला होता.

फैज रशीद याच्‍यावर १५३ (अ) दोन समुदायामध्‍ये तेढ निर्माण करणे, १२४ अ देशद्रोह, कलम २०१ ( पुरावे नष्‍ट करणे ) आणि बेकायदाशीर कृत्‍य प्रकरणी गुन्‍हा दाखल केला होता. पोलिसांनी रशीद याने केलेल्‍या सर्व आक्षेपार्ह पोस्ट डिलीट केल्या होत्या. तथापि, सायबर क्राईम पोलिसांच्या मदतीने, हटविलेल्या पोस्ट पुनर्प्राप्त करण्यात तपासकर्त्यांना यश आले. त्‍यामुळे हा गुन्‍ह्यात पोलिसांना ठोस पुरावे सापडले होते.

विद्यार्थ्याने केलेला गुन्‍हा घृणास्पद : न्‍यायाधीश

रौफचे वर्तन चांगले असून त्‍याची मुक्‍तता करण्‍यात यावी, अशी मागणी त्‍याच्‍या वकिलांनीकेली. "या गुन्‍ह्यातील आरोपी हा अशिक्षित नाही. तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. त्‍याने पुलवामा दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर फेसबूकवर जाणीवपूर्वक पोस्‍ट आणि कमेंट केल्‍या होत्‍या. त्‍याने देशासाठी बलिदान देणार्‍या महान हुतात्‍म्‍यांचा अवमान केला आहे.  त्‍याचा हा गुन्‍हा देशाविरोधी आणि घृणास्‍पद आहे." असे स्‍पष्‍ट करत विशेष न्‍यायालयाचे न्‍यायाधीश सीएम गंगाधर यांनी फैज रशीद याला या प्रकरणी दोषी ठरवले. तसेच या प्रकरणी त्‍याला पाच वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news