Ashes 2023 : स्टोक्सची ‘ती’ चूक इंग्लंडला भोवणार! ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर

Ashes 2023 : स्टोक्सची ‘ती’ चूक इंग्लंडला भोवणार! ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अॅशेस (Ashes 2023) मालिकेतील पहिल्या कसोटीचा आज (20 जून) शेवटचा दिवस आहे. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला (australia) शेवटच्या दिवशी 174 धावांची गरज आहे. त्यांच्या अजून 7 विकेट शिल्लक आहेत. अशा स्थितीत आत्तापर्यंतची समीकरणे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने दिसत आहेत. उस्मान ख्वाजा (34) आणि नाईट वॉचमन स्कॉट बोलँड (13) धावा करून क्रिजवर उभे आहेत. या दोघांनंतर ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स हे मैदानात उतरतील. जे चांगली इनिंग खेळू शकतात. त्यामुळे इंग्लंडवर (england) पराभवाचे संकट निर्माण झाले आहे.

हा सामना एक प्रकारे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकताना दिसत आहे, तर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने अॅशेस कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी केलेली चूक त्याला महागात पडत असल्याचे चित्र आहे. वास्तविक, इंग्लंडने पहिल्याच दिवशी 78 षटकांत 8 बाद 393 धावांवर आपला डाव घोषित केला होता. त्यावेळी जो रूट 152 चेंडूंत 118 धावांवर नाबाद होता. त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले होते. रूटने 'बॅजबॉल' शैलीत फलंदाजी केली, ज्यामुळे त्याचा स्ट्राइक रेट 77.63 होता, जो कसोटीच्या दृष्टीने उत्कृष्ट म्हणता येईल. त्याचवेळी जॉनी बेअरस्टोनेही 'बॅजबॉल' शैलीत फलंदाजी करत 78 चेंडूत 78 धावा फटकावल्या होत्या.

इंग्लिश संघ स्वत:च्याच जाळ्यात फसला (Ashes 2023)

पहिल्या डावात धडाकेबाज फलंदाजी करणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 273 धावा करून बाद झाला. अशा परिस्थितीत आता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 281 धावांचे लक्ष्य आहे. सध्याची परिस्थिती पाहता ऑस्ट्रेलियाला ते सहज गाठेल असे वाटते.

स्टोक्सला आपल्या चुकीचा नक्कीच पश्चाताप होत असणार. तो मंथन करत असेल की, पहिल्या डावात शतकवीर रूटला आणखीन खेळण्याची संधी दिली असती तर बरे झाले असते. दुस-या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडला किमान 450 धावांपर्यंत मजल मारता आली असती. पण स्टोक्सची हुशारी मूर्खपणाची ठरली. केविन पीटरसननेही स्टोक्सने डाव लवकर घोषित करण्यावर टीका केली.

'बॅजबॉल'चे दुष्परिणाम? (Ashes 2023)

सध्या तरी पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी, बेसबॉल शैलीचे कर्तेधर्ते आणि इंग्लिश संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनाही पहिल्या दिवशी वेगवान धावा केल्यावर डाव घोषित करणे हा चुकीचा निर्णय होता, असे वाटायला हवे. वास्तविक, क्रिकेटमध्ये, विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये 'बेसबॉल' शैलीने क्रांती घडवून आणली. यामध्ये फलंदाज गोलंदाजांविरुद्ध आक्रमक वृत्ती स्वीकारतात. मात्र, शेवटच्या दिवशी मॅक्युलमला इंग्लंडच्या गोलंदाजांकडून जबरदस्त पुनरागमनाची अपेक्षा असेल.

'बॅजबॉल' खेळाला क्रिकेटमध्ये आणण्याचे श्रेय इंग्लंड संघाला जाते, ज्याने कसोटी क्रिकेटमध्येही टी-20 शैलीत धावा काढण्यास सुरुवात केली आहे. 'बॅजबव गेम'च्या आगमनानंतर, कसोटी क्रिकेटमध्ये टुक-टुक ऐवजी जोमाने धावा केल्या जाऊ लागल्या आहेत. याच कारणामुळे इंग्लंडने न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानसारख्या संघांना पराभूत केले आहे.

'बॅजबॉल' हे नाव कुठून आले?

'बॅजबॉल गेम'ची सुरुवात कशी आणि केव्हा झाली? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. परंतु न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलमने जेव्हापासून इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले तेव्हापासून ब्रिटीशांची कसोटी सामने खेळण्याची शैली बदलल्याचे अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. मॅक्युलमच्या कोचिंगमध्ये इंग्लंड संघाने कसोटी फॉरमॅटमध्ये टी-20 स्टाईलमध्येही धावा केल्या आणि विजयही मिळवला.

मॅक्युलमही त्याच्या जमान्यात क्रिकेट खेळायचा तेव्हा तो वेगवान धावा करत असे. त्याचे टोपणनाव 'बॅज' होते. या टोपणनावात 'बॉल' जोडून, ​​इंग्लंड संघाच्या रणनितीचे नामकरण 'बॅजबॉल' असे करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news