छत्तीसगडमध्ये मोठी चकमक, आतापर्यंत १३ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले; शोधमोहीम सुरूच

छत्तीसगडमध्ये मोठी चकमक, आतापर्यंत १३ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले; शोधमोहीम सुरूच

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यातील गांगलूर भागात आज (दि.३) सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा चकमक सुरू झाली आहे. जवानांनी चकमक स्थळावरून आतापर्यंत १३ नक्षलवाद्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये ११ पुरुष आणि २ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या चकमकीनंतर आतापर्यंतची सर्वात मोठी शोध मोहीम सुरू आहे.

जवानांचा जंगलाला रात्रभर वेढा

जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. काल सकाळी झालेल्या चकमकीनंतर २४ तास सतत शोधकार्य सुरू होते. कोब्रा २१० बटालियन आणि डीआरजीचे जवान चकमकीच्या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगळवारी संध्याकाळी अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली होती. चकमक झालेल्या जंगला भागात अनेक जखमी नक्षलवादी लपून बसल्याची माहितीही सुरक्षा दलांना मिळाल्याने जवानांनी संपूर्ण जंगलाला रात्रभर वेढा घातला. आज पहाटेपासून पुन्हा शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

बस्तरचे आयजी सुंदरराज यांनी सांगितले की, सुरक्षा दलांना नक्षलवादी नेता पापा राव बिजापूरच्या सेंद्रा भागात असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली. मंगळवारी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला होता. गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.

१३ नक्षलवाद्यांचा खात्मा

डीआरजी, सीआरपीएफ, कोब्रा बस्तर फायटर्स, बस्तारिया बटालियन आणि सीएएफ जवानांची संयुक्त टीम देखील शोध मोहिमेत सामील होती. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. तसेच नक्षलवाद्यांचे मृतदेह विजापूर मुख्यालयात आणण्याची तयारी सुरू आहे. आतापर्यंत १३ नक्षलवाद्यांचा जवानांनी खात्मा केला असून एके ४७, एलएमजी सारखी स्वयंचलित शस्त्रेही सापडली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news