फुकट पास मागणारा कर्मचारी निलंबित; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला होता आरोप

फुकट पास मागणारा कर्मचारी निलंबित; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला होता आरोप

पिंपरी(पुणे); फुकट पास न दिल्यास शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे प्रयोग होऊ देणार नाही, अशी धमकी एका पोलिस कर्मचार्‍यांनी दिल्याचा आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. याची गंभीर दखल घेत संबंधित पोलिस कर्मचार्‍याला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पोलिस नाईक महेश नाळे (नेमणूक : पिंपरी पोलिस ठाणे), असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. पिंपरी येथील एचए मैदानावर 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. यापूर्वी झालेल्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, कराड या ठिकाणी झालेल्या महानाट्याच्या प्रयोगाला पोलिसांनी चांगले सहकार्य केले. मात्र, पिंपरी चिंचवडच्या पोलिस दलातील एका पोलिसाने पास न दिल्यास प्रयोग होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे डॉ. कोल्हे यांनी जाहीररित्या सांगितले. तसेच, धमकी देणार्‍या पोलिसांना कडक समज द्यावी, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली.

याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे नेटकर्‍यांनी पोलिसांचा खरपूस समाचार घेतला. पोलिस दलाची बदनामी होत असल्याचे लक्षात घेत पोलिस आयुक्त चौबे यांनी तडकाफडकी नाळे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच, पोलिस उपायुक्त डॉ. विवेक पाटील यांना संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले.

कारवाईसाठी खा. सुप्रिया सुळेंचे ट्विट

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना धमकी दिल्याचे समजताच बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करीत संबंधित पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, खासदारांना पोलिस अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल, असा प्रश्न उपस्थित करीत राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी ट्विटरद्वारे केले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news