बारामतीत वीजचोरी ; महावितरणने ठोठावला तब्बल 35 लाखांचा दंड

बारामतीत वीजचोरी ; महावितरणने ठोठावला तब्बल 35 लाखांचा दंड

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  सासवड येथील साईनाथ आईस फॅक्टरीला वीजचोरी प्रकरणात आकारलेला 35 लाख 86 हजारांचा दंड भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचे जिल्हा न्यायालयाने बजावले. साईनाथ आईस फॅक्टरीची वीज पूर्ववत जोडून देण्याचा अर्ज त्यांचा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत. सासवड येथे असलेल्या साईनाथ आईस फॅक्टरीची वीजचोरी 6 एप्रिल 2022 रोजी उघडकीस आली होती. त्या वेळी या फॅक्टरीला 2 लाख 34 हजार 243 युनिटची चोरी केल्याबद्दल 35 लाख 86 हजारांचा दंड आकारला होता.

आकारलेल्या दंडाबाबत व वीजपुरवठा जोडून देण्याबाबत साईनाथ फॅक्टरीचे मालक नारायण दगडू पवार यांनी दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता. दिवाणी न्यायालयाने बिल कायम ठेवले. त्यानंतर पवार यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली. यामध्ये आरोपीला काही काळ अटकसुद्धा झाली होती. जिल्हा न्यायालयातदेखील महावितरणने आकारलेला दंड भरावाच लागेल. दंडाची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा जोडून देता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले.

दरम्यान, वरील प्रकरण न्यायालयात असताना साईनाथ आईस फॅक्टरीने दुसर्‍यांदा मीटर बायपास करून वीजचोरी केली. महावितरणच्या पुणे येथील भरारी पथकाने दि. 15 मार्च 2023 रोजी ही वीजचोरी उघडकीस आणली. तेव्हा या ग्राहकाला पुन्हा 22 लाख 32 हजारांचा दंड आकारला. ही रक्कम ग्राहकाने भरली. मात्र, पहिल्या चोरीतील दंडाची रक्कम अद्याप पूर्ण भरलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण रक्कम भरली जात नाही, तोपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून ग्राहकाचा अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणी महावितरणतर्फे अ‍ॅड. सचिन खंडागळे व अ‍ॅड. गणेश डिंबळे यांनी बाजू मांडली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news