‘एआय’मुळे जगावर येऊ शकते वीज संकट

‘एआय’मुळे जगावर येऊ शकते वीज संकट

वॉशिंग्टन : सध्याचा जमाना 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. 'एआय'मुळे अनेक थक्क करणारी कामे होत असताना आपण पाहत आहोत. अनेक चॅटबॉट, रोबो व अनेक यंत्रणांमध्ये 'एआय'चा वापर सुरू आहे; मात्र हळूहळू एआयचे अनेक धोकेदेखील समोर येत आहेत. एकीकडे एआयमुळे नोकर्‍या जाण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच आता याच एआयमुळे जगावर मोठे वीज संकटही येऊ शकते, असा एका रिपोर्टमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

दि न्यूयॉर्करने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, ओपन एआय कंपनीचा चॅटजीपीटी हा चॅटबॉट एका तासाला तब्बल 5 लाख किलोवॅट वीज खर्च करतो. सध्या जगभरात कित्येक मोठ्या कंपन्यांनी आपापले एआय चॅटबॉट लाँच केले आहेत. एकट्या चॅटजीपीटीची आकडेवारी एवढी असेल, तर सगळ्यांची मिळून किती वीज खर्च होत असेल, हा विचारच हादरवून टाकणारा आहे.

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील घरांमध्ये मिळून जेवढी वीज वापरली जाते, त्या तुलनेत तब्बल 17,000 पट अधिक वीज चॅटजीपीटी दररोज वापरते.

चॅटजीपीटीच्या केवळ 20 कोटी युजर्ससाठी हा खर्च होतो. भविष्यात चॅटजीपीटीचा विस्तार झाला, त्याचे युजर्स वाढले की, पर्यायाने त्यासाठी होणारा विजेचा वापरही अधिक होणार आहे.

बिझनेस इन्सायडरला दिलेल्या मुलाखतीत डेटा सायंटिस्ट अ‍ॅलेक्स डी. व्रीज यांनी सांगितले की, गुगल सध्या प्रत्येक सर्च रिझल्टमध्ये जनरेटिव्ह एआय वापरत आहे. एआयमुळे वर्षाला सुमारे 29 बिलियन किलोवॅट प्रतितास एवढी वीज वापरली जाते. केनिया, क्रोएशिया अशा छोट्या देशांना संपूर्ण वर्षभरासाठीदेखील ही वीज पुरून उरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

एआयचा वापर जेवढ्या प्रमाणात वाढणार आहे, तेवढा त्यासाठी लागणार्‍या विजेचा वापरही वाढणार आहे. एआयचे युजर्स सध्या तुलनेने अगदीच कमी आहेत; मात्र भविष्यात जेव्हा सगळ्या क्षेत्रांमध्ये एआय पसरेल व युजर्स वाढतील, तेव्हा त्यासाठी होणार्‍या विजेचा वापरही भरमसाट वाढणार आहे. यामुळे आतापासूनच एआय कंपन्यांनी सोलर किंवा अन्य हरित ऊर्जेचा वापर करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news