कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : एस. टी. महामंडळाच्या कोल्हापूर आगारात चार इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. शिवाई या नावाने ही इलेक्ट्रिक बस शुक्रवारी कोल्हापूर-पुणे मार्गावर धावणार आहे. यासंदर्भात महामंडळाच्या अधिकार्यांनी बसची पाहणी केली असून शुक्रवारपासून या बसमधून प्रवास करण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के आणि यंत्र अभियंता यशवंत कानतोडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल्हापूरला एकूण सहा इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. यापैकी चार बस गुरुवारी कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. या बसेसेचे चार्जिंग ताराबाई पार्क येथील वर्कशॉपमधील चार्जिंग स्टेशनमध्ये करण्यात आले. ही बस एकवेळ चार्जिंग केल्यानंतर किमान 250 कि.मी. प्रवास करू शकते. त्यामुळे या बसेस कोल्हापुरातून पुण्याकडे धावणार आहेत. पहाटे पाचपासून प्रत्येक तासाला एक याप्रमाणे आठ वाजेपर्यंत चार बसेस पुण्यास जाणार आहेत. तर पुण्याहून याचवेळेत चार बसेस कोल्हापुरात येणार आहेत. दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 या वेळैत प्रत्येक तासाला बस पुण्यास रवाना होणार असून पुण्यातून याच वेळेस कोल्हापूरकडे बस येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर-पुणे मार्गावर आठ इलेक्ट्रिक बस धावणार आहेत.
या बससाठी शिवशाही बसप्रमाणे 500 रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. तसेच या बसमधून प्रवाशांना ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजनेसह इतर सर्व सवलती मिळणार आहेत. ही बस प्रदूषणविरहित वातानुकूलित आहे. 2 बाय 2 पुश बॅक सीटस् आहेत. प्रत्येक बाकावर मोबाईल चार्जिंगची सोय आहे. चार स्पीकर व माईक व्यवस्था आहे. बसमध्ये सहा कॅमेरे आणि डीव्हीआर बसविण्यात आले असून 30 दिवस रेकॉर्डिंग राहू शकते. चालकांच्या हालचालीवर नियंत्रण असून तंबाखू, गुटखा अथवा मद्य प्राशन केल्यास बसमध्ये अलार्म वाजत असल्याने प्रवाशांना सतर्क राहता येते. बसमध्ये अत्याधुनिक इंटेलिजन्स ट्रान्स्पोर्ट सिस्टीम आहे. बसला रिव्हर्स कॅमेर्याची सोय आहे. वायफाय सिस्टीम आणि व्हेईकल ट्रेकिंग डिव्हाईस आहे. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, शीतल चिखलवाले उपस्थित होते.