पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक रोखे ( Electoral Bond ) संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चेअरमन दिनेश कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. १२ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान खरेदी केलेल्या आणि राजकीय पक्षांनी पैसे घेतलेल्या बॉण्ड्स संदर्भातील सर्व तपशील सादर केला गेला आहे, असेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.
दिनेश कुमार यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. प्रत्येक निवडणूक बाँड खरेदीची तारीख, खरेदीदाराचे नाव आणि खरेदी केलेल्या इलेक्टोरल बाँडचे मूल्य दिल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला एका पेन ड्राईव्हमध्ये दाेन पीडीएफ फाईलच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. १२ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान खरेदी केलेल्या आणि राजकीय पक्षांनी पैसे घेतलेल्या बॉण्ड्स संदर्भातील सर्व तपशील सादर केला गेला आहे, असेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.
निवडणूक रोखे ( इलेक्टोरल बाँड ) तपशील प्रकरणी 30 जूनपर्यंत वेळ देण्यात यावा, अशी मागणी करणारा स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने केलेला अर्ज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने ११ मार्च रोजी फेटाळला होता. आम्ही एसबीआयला दिलेल्या आदेशानुसार निवडणूक रोखेची माहिती उघड करणे बंधनकारक आहे, स्पष्ट करत निवडणूक रोखे प्रकरणी 30 जूनपर्यंत मूदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी खंडपीठाने फेटाळली होती. बँकेने १२ मार्चपर्यंत निवडणूक रोखे तपशील सादर करावा, अन्यथा अवमानाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल,असेही खडसावले होते. निवडणूक रोखे खरेदी करणार्याचे नाव, रोख्यांचे मूल्य आणि संबंधित राजकीय पक्षांनी पूर्तर्ता केलेले रोखे, अशी माहिती निवडणूक आयोगाला द्यावी. दोन्ही तपशिलांचा संच जुळण्याची गरज नाही. बँकेने मंगळवार (१२ मार्च) पर्यंत निवडणूक राेखे तपशील केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करावा. १५ मार्चच्या संध्याकाळपर्यंत निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाइटवर ही माहिती सार्वजनिक करावी, असेही निर्देशही न्यायालयाने दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रोल बाँडची सर्व माहिती मुख्य निवडणूक आयुक्तालयाकडे मंगळवारी (दि. १२ मार्च) सायंकाळी सादर केली आहे. ही माहिती संकलित करून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.