कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये माजी चेअरमन सर्जेराव माने, बाजीराव पाटील, उत्तम चव्हाण यांच्यासह विरोधी गटाच्या 29 उमेदवारांवर सत्ताधारी गटाकडून तर तानाजी कृष्णा पाटील या सत्ताधारी गटाच्या उमेदवारावर विरोधी गटाकडून हरकत घेण्यात आली. इतर तीन उमेदवारांबाबतही हरकत नोंदविण्यात आली आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या वकिलांकडून हरकतींवर जोरदार युक्तिवाद करण्यात आला. 237 उमेदवारी अर्जांपैकी 10 अपात्र ठरले असून 33 उमेदवारांच्या हरकतीवर रात्री उशिरा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सकाळी 11 वा. अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होेणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे यांनी दिली.
सत्ताधारी आणि विरोधी गटांनी बाजू मांडण्यासाठी वकील दिले होते. उत्तम चव्हाण व तानाजी पाटील यांच्या हरकतीवर सुनावणी दरम्यान वकिलांशिवाय उपस्थित कार्यकर्ते मध्येच बोलू लागले. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी काहीजण एकमेकाच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. हरकतींवरील सुनावणी दरम्यान निवडणूक कार्यालयात दोन्ही गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी सकाळी 11 वा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तीन टप्प्यांमध्ये झाली. छाननीच्या निमित्ताने निवडणूक कार्यालय परिसरात उमेदवार, सूचक, अनुमोदक आणि समर्थकांची मोठी गर्दी होती. दरम्यान, पोलिस बंदोबस्तही तैनात केला होता. दुपारी अडीचनंतर हरकतींवर सुनावणी सुरू झाली. कारखान्याच्या पोट पोटनियमातील तरतुदीनुसार नोंद क्षेत्रातील ऊस कारखान्याकडे पुरवठा न केल्याने कारखाना करारनाम्याचा भंग केला म्हणून सत्ताधारी गटाकडून विरोधी गटातील माजी चेअरमन सर्जेराव माने, बाजीराव पाटील, उत्तम चव्हाण यांच्यासह 29 उमेदवारांवर हरकत घेण्यात आली. सत्ताधारी गटाचे तानाजी पाटील यांची गोकुळ दूध संघाकडून उमराव पाटील पाणीपुरवठा संस्थेला केलेल्या कर्ज पुरवठ्याची बाकी थकीत आहे. यामध्ये पाणीपुरवठा संस्थेचे संचालक पाटील यांनी हमीपत्र दिल्यामुळे त्यांच्या अर्जावर विरोधकांनी हरकत घेतली.
अपात्र ठरविलेल्या दहा उमेदवारांमध्ये नऊ उमेदवार हे ऊस उत्पादक गट क्र. 1-1, ऊस उत्पादक गट क्र. 3-1, ऊस उत्पादक गट क्र. 5-1, ऊस उत्पादक गट क्र. 6-6 तर इतर मागास प्रतिनिधी गटातील एका उमेदवाराचा समावेश आहे. अपात्र उमेदवारांची नावे वगळून पात्र अंतिम उमेदवारांची नावे बुधवारी सकाळी 11 वा. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय तसेच कारखाना कार्यस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.