तेलंगणाचे मंत्री रामाराव यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

तेलंगणाचे मंत्री रामाराव यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

हैदराबाद, वृत्तसंस्था : सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) कार्याध्यक्ष आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामाराव यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली असून, रामाराव यांच्यावर सरकारी कार्यालयातून पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

काँग्रेस खासदार रणदीपसिंह सुरजेवाला यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे या आशयाची तक्रार केली होती. रामाराव यांनी 20 नोव्हेंबर रोजी टी-वर्क्स (सरकारी संस्था) कार्यालयाला भेट दिली आणि तेथे मोठ्या संख्येने तरुणांना नोकर्‍या देण्याचे आश्वासन दिले. निवडणुका असलेल्या राज्यातील मंत्र्यांना अधिकृत दौर्‍यात प्रचार करता येत नाही. निवडणूक प्रचारासाठी सरकारी यंत्रणा किंवा कर्मचारीही वापरता येत नाहीत.

सुरजेवाला यांच्या तक्रारीवर चौकशीअंती आयोगाने रामाराव यांना 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उत्तर देण्याची मुदत दिली आहे. मुदतीत उत्तर न दिल्यास, त्यांना या प्रकरणात काही सांगायचे नाही, असे गृहीत धरले जाईल आणि निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाईल. तेलंगणात 30 नोव्हेंबरला मतदान आहे. विधानसभेसाठी काँग्रेस, बीआरएस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत आहे. निकाल 3 डिसेंबरला लागेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news