पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीतील पहिल्यात टप्प्यात १९ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमधील कूच बिहार येथे मतदान होणार आहे. या दिवशी पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी कूचबिहारला भेट देवू नये असा सल्ला निवडणूक आयोगाने दिला आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांना निवडणूक आयोगाने 18 आणि 19 एप्रिल रोजी कूचबिहारचा दौरा रद्द करण्याचा सल्ला दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी या मतदारसंघात मतदान होणार आहे. प्रस्तावित दौरा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
आदर्श आचारसंहिता (MCC) अंतर्गत, राज्यपालांनी जारी केलेल्या कार्यक्रमात प्रस्तावित केल्यानुसार कोणताही स्थानिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकत नाही. आयोगाने असेही नमूद केले आहे की, 18 आणि 19 एप्रिल दरम्यान संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि पोलिस दल निवडणूक व्यवस्थापनात व्यस्त असेल. दरम्यान तृणमूल काँग्रेसने याआधी राज्यपालांविरुद्ध आगामी निवडणुकांमध्ये 'बेकायदेशीर हस्तक्षेप' केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.