यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चे सावट? अमेरिकन संस्थांचा अंदाज

यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चे सावट? अमेरिकन संस्थांचा अंदाज

पणजी : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या मान्सूनवर 'एल निनो' या वातावरणीय प्रक्रियेचे सावट असण्याची शक्यता अमेरिकेतील 'एनओओए' आणि 'स्कायमेट' या हवामान संस्थांनी व्यक्त केली आहे. 'एल निनो' तयार झाल्यास पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. या संस्थांच्या अंदाजानुसार सलग तीन वर्षांनंतर विषुववृत्तीय प्रशांत महासागर प्रदेशातून ला निनाचा प्रभाव संपला आहे. सध्या तेथे 'एल निनो' साठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. याबाबत पुढील एक महिना निरीक्षण करणे आवश्यक आहे.

भारतीय हवामान खात्याने याबाबत अजून कोणताही अंदाज व्यक्त केलेला नाही. खात्यातर्फे केला जाणारा मान्सूनच्या लांब पल्ल्याच्या अंदाज एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. त्यावेळी 'एल निनो'चा प्रभाव आहे का नाही याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. शात्रज्ञ डॉ. रमेश कुमार म्हणाले की, यंदा 'एल निनो'ची शक्यता असली तरी दर 'एल निनो'मध्ये मान्सूनवर परिणाम होईलच, असे नसते. याआधी 'एल निनो' असताना चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. 1997 मध्ये शतकातील सर्वात मोठी 'एल निनो' परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यावर्षी इंडियन ओशन डायपोल' या प्रक्रियेने 'एल निनो'चा प्रभाव कमी केला होता.

गोवा वेधशाळेचे शास्त्रज्ञ राहुल मोहन म्हणाले की, 'एल निनो' दरवेळेस मान्सूनसाठी वाईट असेल असे नाही. 'एल निनो' वर परिणाम करणारे अन्य घटक, वातावरणीय घटना असतात. यंदा 'एल निनो' चा परिणाम होणार का नाही ते हवामान खात्याच्या एप्रिल महिन्यातील अंदाजावरून स्पष्ट होईल.

एल निनो म्हणजे काय ?

विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पूर्व क्षेत्रात पाण्याचे तापमान सर्वसामान्य तापमानापेक्षा जास्त वाढते. त्यामुळे पूर्वीय वार्‍यावर परिणाम होऊन मान्सून कमजोर होण्याची शक्यता असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news