ऑनलाईन कारभार चालवणार्‍यांना आम्ही लाईनवर आणले : एकनाथ शिंदे

ऑनलाईन कारभार चालवणार्‍यांना आम्ही लाईनवर आणले : एकनाथ शिंदे

Published on

परभणी, पुढारी वृत्तसेवा : घरात बसून ऑनलाईन कारभार पाहणार्‍यांना आम्ही झटका दिला आणि त्यांना लाईनवर आणले, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांना लगावला. मात्र, त्यांचा स्पष्ट नामोल्लेख केला नाही.

'शासन आपल्या दारी' या उपक्रमानिमित्ताने येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी हा राजकीय कार्यक्रम नसल्याचे स्पष्ट करताना विरोधकांवर हल्लाबोल केला.

काही भोंगे सकाळपासूनच शिव्या-शाप, आरोप-प्रत्यारोप करीत सरकारवर टीका करत आहेत. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही भोंगा नाही. आमचे भोंगे जनतेच्या विकासासाठीच वाजत आहेत. त्यामुळेच 'शासन आमच्या दारी' या उपक्रमाला जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

आमचे सरकार मजबूत

ते म्हणाले, आमचे सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार, अशा अफवा विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत. मात्र, केंद्रातील मोदी सरकारचे मोठे पाठबळ असल्याने व अजित पवार आमच्या सोबत आल्यामुळे आमचे सरकार आणखी मजबूत झाले आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकर्‍याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याचे पचत नाही का, असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा उल्लेख करताना ते म्हणाले, सर्वसामान्यांना या योजनांचा लाभ मिळत आहे. महिला बचत गटांना पाठबळ देण्यासाठी महिला शक्ती गट तयार करण्याचे काम केले जात आहे. असे असताना विरोधक मात्र विकासाचा मुद्दा नसल्याने केवळ गुगल्या टाकण्याचे काम करीत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

राजकीय वातावरणात संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम काहीजण करीत आहेत. तथापि त्यांना अजित पवारांची भूमिका मान्य झाली आहे, असेच वाटू लागली आहे असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

पाण्याचे काटेकोर नियोजन : फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सद्याची पावसाची स्थिती चिंताजनक आहे. त्याद़ृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. पाण्याचा वापर काटकसरीनेच करावा लागणार असून, त्यासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन केले जात आहे. विरोधकांना दुसरे कोणतेही काम नसल्यामुळे त्यांनी सरकारवर टीका करण्याचा कार्यक्रम हाती घेतल्याचा हल्लाबोलही फडणवीस यांनी केला.

सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी : अजित पवार

मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचा निर्वाळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. हे सरकार शेतकर्‍यांना कधीच वार्‍यावर सोडणार नाही. त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेऊन त्यानुसार उपाययोजना केल्या जात आहेत, असे सांगताना त्यांनी विरोधक फक्त टीका करण्यात मग्न असल्याचा टोला लगावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news