पुणे : पवार निकटवर्तीयांवरील आठवी कारवाई

पुणे : पवार निकटवर्तीयांवरील आठवी कारवाई

दिगंबर दराडे

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची करडी नजर आहे. यात बिल्डर अनिरुद्ध देशपांडे, अविनाश भोसले, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, नीता पाटील, अतुल क्षीरसागर, जंगल वाघ यांचा समावेश आहे. अलीकडच्या काळात या धनाढ्य नातेवाइकांची बेहिशेबी मालमत्ता तपासण्याचा धडाका लावल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

देशात मुंबईनंतर सर्वाधिक महसूल देणारे सर्कल म्हणून पुणे विभागाचा नावलौकिक आहे. मार्च महिन्यात आर्थिक विवरण आयकर विभागाला सादर करावे लागते. मुंबईनंतर पुणे विभाग सर्वाधिक महसूल देण्याकरिता आघाडीवर आहे. यात काळे धन व छुपी मालमत्ता यांच्या सतत शोधामध्ये आयकर अधिकारी व्यस्त असतात.

या विभागाने गेल्या वर्षभरापासून शरद पवारांच्या निकटवर्तीयांच्या आर्थिक विवरणावर नजर ठेवून सर्व ऑपरेशन प्लॅन केले होते. त्याप्रमाणे पहिला छापा धनाढ्य बिल्डर अविनाश भोसले यांच्यावर टाकण्यात आला. यामध्ये ईडीसह आयकर विभागही सक्रीय झाला होता. त्यानंतर जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, नीता पाटील, अतुल क्षीरसागर, जंगल वाघ यांच्या संपत्तीवर टाच आली होती. या सर्वांनाच आयकर विभागाच्या पायर्‍या झिजवाव्या लागल्या. त्यानंतर 15 फेब्रुवारीला अनिरुध्द देशपांडे यांच्या संपत्तीच्या चौकशीसाठी आयकर विभागाने त्यांच्या घरी आणि कार्यालयावर छापे टाकले.

…असे झाले सर्च ऑपरेशन
विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, हे ऑपरेशन अतिशय गोपनीय पद्धतीने करण्यात आले. यात विभागातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांची एक टीम तयार केली होती. ही टीम पहाटे पाच वाजताच शहराच्या विरुद्ध दिशेने निघाली. जेणे करून याची खबर छापे टाकणार्‍या व्यक्तीला कळू नये. सुमारे शंभर किलोमीटर लांब जाऊन ही टीम पहाटे पुण्याच्या दिशेने पुन्हा आली.

देशपांडे यांच्या घराचा परिसर सील केला. त्यांच्या घरातील कागदपत्रांचा ताबा अधिकार्‍यांनी घेतला. यात घर आणि कार्यालयातील अनेक आर्थिक ताळेबंद तपासण्यात आले. शेकडो कागदपत्रे घेऊन अधिकार्‍यांची टीम सायंकाळी कार्यालयाकडे रवाना झाली. बेहिशेबी मालमत्तेचा ताळेबंद तपासण्यास सुमारे एक महिन्याचा कालावधी लागू शकतो.

दिल्लीहूनच ऑपरेशनची तयारी …

सूत्रांनी सांगितले की, ज्यांचे विवरण तपासायचे आहे त्याची कल्पना दिल्लीतील मुख्यालयाला असते. त्यानुसार त्या राज्यातील अधिकार्‍यांना गोपनीय सूचना दिल्या जातात. आम्हालादेखील कुठे छापा टाकायचा आहे, याची पूर्वकल्पना शेवटच्या टप्प्यात दिली जाते. त्याची प्रेसनोटदेखील दिल्ली कार्यालयातून निघते, त्यामुळे प्रसारमाध्यमांना आम्ही माहिती देऊ शकत नाही.

… अजून कोण गळाला लागणार?

पुणे विभागाला पाच हजार कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले असून, दरवर्षी कर बुडविणार्‍यांना अशाप्रकारे सर्च ऑपरेशनद्वारे शोधले जाते. हे छापे ऑक्टोबर ते डिसेंबर व फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये सर्वाधिक टाकले जातात. पुणे विभागाचे आयकराचे टार्गेट सुमारे पाच हजार कोटींच्यावर आहे. पुणे विभाग हा देशाला सर्वाधिक महसूल देणारा विभाग आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news