Education : अंतराळ अभ्यासाची अनोखी करिअर वाट

Education : अंतराळ अभ्यासाची अनोखी करिअर वाट

अंतराळातील गूढ रहस्यांबाबत मानवाला पुरातन काळापासून कुतूहल आहे. अ‍ॅस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र अर्थात विश्वाच्या अथांग पसार्‍यातील गूढ, रहस्यमय गोष्टींचे आकलन करून देणारे हे शास्त्र आहे. हे शास्त्र अतिशय रंजक असले तरी या क्षेत्रात मोठी मेहनत करण्याची तयारी देखील आवश्यक असते. मेहनतीच्या बदल्यात तुम्हाला नाव, सन्मान आणि काहीतरी नवे जगासमोर आणण्याचा आनंदही मिळतो हे माात्र नक्की.

खगोल शास्त्रात करिअर घडवण्याची इच्छा असणार्‍या उमेदवारांना बारावीनंतर बी.एस्सी. भौतिकशास्त्र अथवा गणित विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इ अ‍ॅण्ड टी यापैकी एका विषयात बीईची पदवी घेणे आवश्यक असते. या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि संगणकाचे उत्तम ज्ञान असणे गरजेचे आहे. याबरोबर अवकाशाविषयीचे अफाट कुतूहल आणि आव्हाने स्वीकारण्याचे गुण अंगी असणे आवश्यक आहे. या शास्त्रात शिक्षण घेतल्यानंतर ज्ञानदानाच्या आणि संशोधनाच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. तसेच प्रयोगशाळा, म्युझियम आणि निरीक्षणांच्या वेगवेगळ्या कामासाठीही करिअरची दालने खुली होतात. हे शास्त्र अनेक शाखांमध्ये विभागले जाते. उदा. अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, अ‍ॅस्ट्रो मेटेरॉलॉजी, अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी, अ‍ॅस्ट्रोजिऑलॉजी, अ‍ॅस्ट्रोमेट्री इ. या सर्वच शाखांच्या माध्यमातून विश्वाच्या रहस्याचे गूढ उकलण्यासाठी प्रयत्न केला जातो.

या शाखेकडे वळताना मात्र आपल्याला करिअर नेमके कोणत्या विभागात करायचे आहे. यावर ही निवड अवलंबून असते. उदा. थेरॉटिकल अ‍ॅस्ट्रॉनॉमी किंवा ऑब्झर्वेशन यामध्ये करिअर करायचे असेल तर बारावीनंतर बी.एस्सी. (भौतिकशास्त्र किंवा गणित) करणे उत्तम ठरेल. यानंतर खगोलशास्त्रात पदव्युत्तर पातळीवरचा कोर्स थेरॉटिकल्स अ‍ॅस्ट्रॉनॉमीच्या स्पेशलायझेशन सोबत करता येईल. हा कोर्स देशातील निवडक विद्यापीठांमध्ये आणि काही संस्थांमध्ये उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त इन्स्ट्रूमेंटेशन किंवा एक्सपिरीमेंटल अ‍ॅस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करणाची इच्छा असणार्‍यांनी बारावीनंतर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन यापैकी एका विषयात इंजिनिअरिंगची पदवी मिळवणे आवश्यक आहे. खगोलशास्त्रात पीएच.डी. करण्यासाठी पदवीनंतर जॉईंट एंट्रस स्क्रीनिंग टेस्ट (जेस्ट) पास करणे आवश्यक असते.

या क्षेत्रात काम करणे अतिशय आव्हानात्मक आणि रोमांचकारी ठरते. पदव्युत्तर आणि पीएच.डी. स्तरावरच असे कोर्स करता येतात. असे असले तरी भारतात एक वर्षाचा जॉईंट अ‍ॅस्ट्रॉनॉमी प्रोग्राम संचलित करणार्‍या बर्‍याच संस्था आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही कुठल्याही संस्थेत पीएच.डी. करण्यासाठी प्रवेश घेऊ शकतात. याची प्रक्रिया थोडी दीर्घ असते. पहिल्यांदा दोन वर्षे ज्युनिअर रिसर्च फेलोशिप करावी लागते आणि नंतर सीनिअर रिसर्च फेलोशिप करावी लागते.

अ‍ॅस्ट्रोफिजिक्स हा प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण अथवा पीएच.डी. केली असल्यास कुठल्याही आयआयटीमध्ये हा विषय शिकवता येतो. अ‍ॅस्ट्रॉनॉमीच्या अभ्यासानंतर कुठलाही एक संबंधित विषय घेऊन शास्त्रज्ञाच्या रूपातही करिअरच्या बर्‍याच संधी उपलब्ध आहेत. अ‍ॅस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करू इच्छिणार्‍या तरुणांना एरोस्पेस कंपनी, सॅटेलाईट निर्माता कंपनी, नॅशनल लॅबोरेटरीज किंवा ऑब्जर्व्हेटीज या क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

याव्यतिरिक्त एखाद्या म्युझियममध्ये किंवा सायन्स सेंटरमध्ये पब्लिक एज्युकेशनसाठीदेखील काम करता येते. ज्युनिअर रिसर्चर म्हणून रुजू झाल्यानंतर चांगले विद्यावेतन म्हणून मिळतात. नंतर सीनिअर रिसर्च म्हणून आणि पुढे पोस्ट डॉक्टरेट फेलो म्हणून टप्प्याटप्प्याने मानधनात वाढ होत जाते. पगारासोबतच वार्षिक बुक ग्रँट मिळते. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील वाढती जागतिक स्पर्धा पाहता आव्हानांना सामना करण्याची तयारी आणि आव्हानांवर मात करण्यासाठीची जिद्द, सचोटी, अभ्यासूपणा ही गुणवैशिष्ट्ये असणार्‍यांनी निश्चितपणाने या क्षेत्राकडे वळले पाहिजे.

रमा मिलिंद

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news