पाटणा, वृत्तसंस्था : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सोमवारी चौकशी केली. लँड ऑफ जॉब प्रकरणी लालूंसह त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिहारमधील संयुक्त जनता दलासोबतची आघाडी तुटल्यानंतर दुसर्याच दिवशी लालू यांची चौकशी करण्यात आली. कन्या मिसा भारती हिच्यासह लालू दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर राहिले. ईडीच्या अधिकार्यांनी त्यांची तब्बल दहा तास चौकशी केली. 19 जानेवारी रोजी ईडीने लालू आणि त्यांचे पुत्रे तेजस्वी यादव यांना नोटीस बजावली होती. वडील आजारी असल्यामुळे आपण त्यांच्यासोबत गेले होते, अशी माहिती मिसा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.