पत्राचाळ प्रकरणात स्वप्ना पाटकर यांची आज ईडीकडून चौकशी

स्वप्ना पाटकर
स्वप्ना पाटकर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : अधिकाधिक सबळ पुरावे गोळा करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे ईडीने स्वप्ना पाटकर यांना समन्स बजावून मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने स्वप्ना पाटकर यांची याआधी चौकशी करुन जबाब नोंद केला होता. याच चौकशीनंतर ईडीने स्वप्ना पाटकर यांना या प्रकरणात साक्षीदार केले आहे. त्यामुळे स्वप्ना या ईडीला आता आणखी काय माहिती आणि पुरावे देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या सुमारे १ हजार ४० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन ईडी तपास करत आहे. याच प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री या बंगल्यावर छापेमारी करुन राऊतांना चौकशीसाठी ताब्यात घेत ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली. ते सध्या ईडी कोठडीत आहेत. न्यायालयाने सोमवारी राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.

संजय राऊत यांच्या अटकेनंतर ईडीने त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावून ६ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार वर्षा राऊत या शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ईडीसमोर हजर झाल्या. ईडीने रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता स्वप्ना पाटकर यांच्या चौकशीमुळे संजय राऊत यांच्या अडचणी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

स्वप्ना पाटकर या पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुजीत पाटकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचा घटस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्ना पाटकर यांनी ईडी कार्यालयात कागदपत्रांसह चौकशीसाठी हजेरी लावली होती. आता पुन्हा त्यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय खुलासा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दादर येथे फ्लॅटसह १० जमिनीची खरेदी

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळ्यातील ११२ कोटी रुपये प्रवीण राऊत यांना मिळाले होते. प्रवीण राऊतांच्या कंपनीतून १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात वळविण्यात आले. घोटाळ्यातील याच पैशांतून दादर येथील फ्लॅटसह अलिबागमध्ये १० जमिनी खरेदी करण्यात आल्याचा आरोप ईडीने राऊतांवर ठेवला आहे. तसेच राऊत दाम्पत्याच्या बॅंक खात्यात काही मोठ्या रक्कमांचेही व्यवहार झाल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. त्याआधारे ईडी अधिक तपास करत आहे.

११.१५ कोटींच्या मालमत्तेची जप्ती

ईडीने पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी प्रविण राऊत यांच्या पालघर, सफाळे, पडघा येथील जमिनीसोबतच संजय राऊत आणि वर्षा राऊत यांचा दादरमधील फ्लॅट आणि वर्षा राऊत व सुजीत पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या भागीदारीतील किहीम, अलिबागमधील जमिनी अशा तब्बल ११.१५ कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news