Economics : पोस्टमन बनलाय चालते-फिरते ‘एटीएम!’

Economics : पोस्टमन बनलाय चालते-फिरते ‘एटीएम!’
Published on
Updated on

Economics : गरजेच्यावेळी आपल्या बँक खात्यावर जमा असलेले पैसे हे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, चेकबुक, पासबुक या कशाचाही वापर न करता, बँकेमध्येही न जाता आपल्याला पोस्टातून किंवा आपली टपालपत्रे घेऊन येणार्‍या पोस्टमनकडून मिळू शकतात, याची अनेकांना माहिती नसते. यासाठी आवश्यक असतो तो केवळ आपला आधार क्रमांक आणि तुमच्या अंगठ्याचा ठसा!

गेल्या काही वर्षांत टपाल खात्याने कात टाकली असून संगणकीकरण, इंटरनेट यांच्या माध्यमातून अद्ययावतीकरणाकडे वेगाने आगेकूच केली आहे. पोस्ट पेमेंट बँकसारख्या योजनेमुळे टपाल खात्यांचे बँकीकरण झाले आहे. आज देशातील 1.36 लाख टपाल कार्यालयांमध्ये असणार्‍या 1.86 लाख एईपीएस डिव्हाईसच्या माध्यमातून ग्रामीण, दुर्गम भागातील लोकांना आपल्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी उन्हातान्हातून, काटेरी वाटेवरून दोन-चार मैलांची पायपीट करण्याची गरज उरलेली नाही. किंवा तासन् तास रांगेत उभे राहण्याची गरज नाही. त्यांना पोस्टमनकडून आपल्या खात्यातील पैसे घरबसल्या काढता येऊ शकतात.

Economics : या संकल्पनेचा खर्‍या अर्थाने सदुपयोग झाला तो कोव्हिड काळात. कारण त्यावेळी अर्थव्यवहार ठप्प असल्यामुळे आणि रोजगार, उद्योग बंद असल्यामुळे साठवून ठेवलेले पैसे काढण्याशिवाय अनेकांना गत्यंतर उरले नव्हते. पण यासाठी बँकेमध्ये जावे, तर गर्दीच्या संपर्कात येऊन संसर्ग होण्याची भीती होती. अशा वेळी टपाल खात्याच्या या अभिनव उपक्रमाने अनेकांना दिलासा मिळाला. 2020 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून टपाल खात्याने 24 मार्च ते 23 एप्रिल या लॉकडाऊनच्या काळात देशभरातील काही राज्यांत तब्बल 412 कोटी रुपयांचे वितरण केल्याची नोंद आहे. सुमारे 21 लाखांहून अधिक व्यवहार या काळात झाले. देशभरातील आकडा विचारात घेतल्यास तो 6000 कोटींहून अधिक आहे.

Economics : या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केलेले असणे गरजेचे आहे. तसे असल्यास आपल्या कोणत्याही बँक खात्यातील दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम आपण पोस्टातून किंवा पोस्टमनकडून थंबिंग मशिनवर अंगठ्याचा ठसा देऊन काढून घेऊ शकतो. यासाठी आपल्याला घराजवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा लागेल. तेथे आपल्या बँक खात्याची आणि अन्य माहिती दिल्यानंतर पोस्ट खात्यातील अधिकारी पोस्टमनला घरी पाठवतात. पोस्टमनकडून आपला बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक त्याच्याकडील अ‍ॅपवर किंवा मायक्रो एटीएम डिव्हाईसवर नोंदवला जातो. त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येतो आणि तो ओटीपी अ‍ॅपवर नोंदवल्यानंतर तत्काळ आधार क्रमांकाची विचारणा होते. हा क्रमांक नोंदवल्यानंतर या डिव्हाईसवर आपल्या अंगठ्याचा ठसा घेऊन सत्यता पडताळणी केली जाते. तसेच कोणत्या बँकेतून पैसे काढावयाचे आहेत, त्या बँकेचे नाव नोंदवले जाते.

Economics : ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर तत्काळ आपल्या बँक खात्याचा तपशील पोस्टमनच्या अ‍ॅपवर उपलब्ध होतो. त्यानुसार आपल्याला आवश्यक असणारी रक्कम नोंदवून अंगठ्याचा ठसा घेऊन आपल्याला दिली जाते. विविध राज्यातील टपाल कार्यालयांनी या सेवेचा लाभ नागरिकांना घेता यावा यासाठी काही ठरावीक क्रमांक सार्वजनिक केले आहेत. टपाल कार्यालयांच्या बाहेर त्यांची यादी लावण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना या सेवेचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये. पोस्टाची ही सेवा खरोखरीच क्रांतिकारी आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती, दिव्यांग, आजारपणाने ग्रासलेले रुग्ण, चालण्या-फिरण्याची क्षमता नसणारे, गरीब, शेतकरी, मजूर यांसारख्यांना ही सेवा खरोखरीच दिलासादायक आहे. तसेच आपले पाकीट किंवा खिशातील पैसे गहाळ अथवा चोरीस गेले, तर हळहळत अथवा हतबल होऊन न बसता या अशा सोयीचा लाभ घेऊन आपण गरज भागवू शकतो. म्हणूनच चालते-फिरते एटीएम बनलेला पोस्टमन हा यांच्यासाठी देवदूतच ठरत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news