महापूर, चक्रीवादळे, अतिवृष्टी, ढगफुटी, भूकंप यांसारख्या वाढत्या नैसर्गिक आपत्तींमुळे आज वैश्विक समुदाय चिंताक्रांत झाला आहे. editवाढत्या आपत्ती या पुन: पुन्हा मानवाला निसर्गासोबत जगा, असा इशारा देत आहेत. विकासवेडा मानव हा आक्रोश कधी ऐकणार?
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलांच्या काळात निसर्गाचा कहर हा जवळपास नित्याचा झाला आहे. निसर्गाच्या रुद्रावताराच्या काळात प्रगतीच्या उच्चांकाकडे निघालेला मानव काहीही करू शकत नाही. चंद्र आणि इतर अनेक ग्रहांना स्पर्श करणारे विज्ञानही नैसर्गिक आपत्तींपुढे थिटे पडताना दिसते. गेल्या काही वर्षांपासून भूकंप, त्सुनामी, महापूर, चक्रीवादळे, ढगफुटी, अतिवृष्टी, भेदक दुष्काळ यांसारख्या आपत्तींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तींशी लढण्याची मानवाची ताकद आणि क्षमताच संपते की काय, अशी भीती वाटू लागली आहे. काही दिवसांपूर्वी मोरोक्को या आफ्रिकन देशात झालेल्या प्रलयकारी भूकंपात 2 हजार 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक जखमी झाले आहेत.
भूकंप ही सर्वात मोठ्या प्रमाणावर घडणार्या नैसर्गिक घटनांपैकी एक असून, त्याचा उगम पृथ्वीच्या प्रागैतिहासिक काळापासून आहे. भूकंप म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा थरकाप, ज्यामुळे त्याच्या लिथोस्फिअरमध्ये अचानक ऊर्जा सोडली जाते आणि त्यातून भूकंपाच्या लाटा निर्माण होतात. तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे भूकंपाविषयीची माहिती अचूकपणाने मिळणे शक्य झाले आहे; परंतु भूकंपशास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार भूकंपाचा अंदाज लावणे शक्य नाही. तथापि, त्यापासून बचावासाठीची पूर्वतयारी करता येणे शक्य आहे. विशेषतः आजच्या माहिती आणि संवादक्रांतीच्या काळात लोकांना भूकंपाविषयी पूर्वीपेक्षा लवकर कळण्यास मदत झाली आहे.
मोरोक्को हा मोठा इतिहास असणारा देश आहे. उत्तर आफ्रिकेत अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्राजवळ असणार्या या देशाला अल्जेरिया, स्पेन आणि पश्चिम सहारा यांनी वेढलेले आहे. जगाच्या एका कोपर्यात वसलेला हा देश युरोपच्या जवळ आहे. 1912 मध्ये मोरोक्को-फ्रान्स कराराने फ्रान्स मोरोक्कोचा संरक्षक बनला. दुसर्या महायुद्धानंतर मोरोक्कोने स्वातंत्र्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आणि 1944 मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी इस्टिक्कल किंवा इंडिपेंडन्स पार्टीची स्थापना करण्यात आली. 1953 मध्ये युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ स्टेटच्या आदेशानुसार लोकप्रिय सुलतान मोहम्मद पाचवा यांनाफ्रान्सने निर्वासित केले होते. त्याची जागा मोहम्मद बेन अराफा यांनी घेतली. पण त्यामुळे मोरोक्कन लोकांनी स्वातंत्र्यासाठी आणखी दबाव आणला. 1955 मध्ये मोहम्मद पाचवा हा मोरोक्कोला परत येऊ शकला आणि 2 मार्च 1956 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले.
1956 मध्ये भारताने सर्वप्रथम मोरोक्कोला मान्यता दिली. तेव्हापासून दोघांमधील संबंध कायम आहेत. दोन्हीही देश अलिप्ततावादी चळवळीचे सदस्य आहेत. मोरोक्को हा आफ्रिकन युनियन आणि अरब लीगसारख्या आंतरराष्ट्रीय गटांचा भाग आहे. अलीकडेच भारताच्या पुढाकाराने आफ्रिकन युनियनचा जी-20 मध्ये समावेश करण्यात आला आहे. संकटकाळात मानवाच्या रक्षणासाठी पुढे येणे, ही संपूर्ण जगाची जबाबदारी आहे. त्यामुळे जी-20 परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मोरोक्कोमधील भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला आणि या कठीण काळात जागतिक समुदाय मोरोक्कोच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत, असे अभिवचन दिले.