पुढारी ऑनलाईन डेस्क : आज पहाटे ४.१५ वाजता सिक्कीममधील युकसोमपासून वायव्येला ७० किमी अंतरावर भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनूसार हा भूकंप ४.३ रिश्टर स्केलचा होता. (Earthquake in Sikkim) यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झालेले नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनूसार सिक्कीममध्ये ४.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. सिक्कीममध्ये भूकंप येण्याच्या एक दिवस आधी गुजरातमधील सुरत जिल्ह्यात ३.८ रिश्टर स्केलचा हादरा जाणवला होता. ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील सोनितपूर व्यतिरिक्त शेजारच्या पश्चिम कार्बी आंगलांग, कार्बी आंगलाँग, गोलाघाट आणि मोरीगाव जिल्ह्यातील लोकांनाही भूकंपाचे धक्के जाणवले.
तुर्कस्तान आणि सीरियात भूकंप झाला. यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. हा भूकंप होण्यापूर्वी डच संशोधक फ्रॅंक होंगरबीटस यांनी अंदाज व्यक्त केला होता की, तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे धक्के बसतील. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, वातावरणातील बदल पाहता भारतालाही भूकंपाचा धोका आहे. अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप होईल आणि त्याचे धक्के पाकिस्तानसह भारतातही बसतील.
तुर्कीमध्ये आतापर्यंत बऱ्याचवेळा भूकंप झाले आहेत. आतापर्यंचे भूकंप पाहता फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेला हा भूकंप सर्वात मोठा विनाशकारी आहे. या भूकंपात आतापर्यंत २८,००० लोक मृत झाले आहेत. हा आकडा वाढण्याचा अंदाज अंदाज संयुक्त राष्ट्रांचे (UN – United Nations) मदत प्रमुख मार्टिन ग्रिफिथ यांनी वर्तविला आहे. यापूर्वी २७ डिसेंबर १९३९ ला तुर्कीमध्ये भूकंप झाला होता. त्याची तीव्रता ८.२ रिश्टर स्केल होती. यात तब्बल ३०,००० हून अधिक लोक मृत झाले होते.