कोल्हापूर जिल्ह्यात यापुढे ई- रेशन कार्ड

कोल्हापूर जिल्ह्यात यापुढे ई- रेशन कार्ड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात यापुढे ऑनलाईन स्वरूपाचे ई- रेशन कार्ड मिळणार आहे. त्याचे वितरण सुरू झाले असून कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण कार्यालयातून अशी तीन ई-कार्ड लाभार्थ्यांना देण्यात आली आहेत. यामुळे पारंपरिक रेशन कार्ड टप्प्याटप्प्याने बंद होणार आहे.

राज्य शासनाने क्यूआर कोड असलेले ऑनलाईन रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन रेशन कार्ड प्रणालीमुळे नागरिकांना नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करणे, पत्ता बदलणे, नावातील दुरुस्ती तसेच नवीन नाव समाविष्ट करणे, वगळणे ही कामे आता घरबसल्या करता येणार आहे.

राज्य शासनाने ई-रेशन कार्ड देण्याबाबत 21 फेब—ुवारी रोजी आदेश दिले होते. त्यानंतर आवश्यक संगणक प्रणाली विकसित करण्यात आली. या प्रक्रियेद्वारे जिल्ह्यात सर्वत्र कामकाज सुरू झाले असून शहर अन्नधान्य वितरण कार्यालयात दाखल झालेल्या तीन अर्जांवर कार्यवाही करून संबंधितांना ई-रेशन कार्डचे वितरण करण्यात आले आहे.

डीजी लॉकर्समध्येही दिसणार रेशन कार्ड

ई-रेशन कार्ड डीजी लॉकर्समध्येही दिसणार आहे. मेल, मोबाईल फोन आदीद्वारेही पीडीएफ, फोटो स्वरूपात हे ई-रेशन कार्ड हव्या त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ई-सेवा केंद्रातूनही हव्या त्या वेळेला हे कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढता येणार आहे. यामुळे दैनंदिन कामकाजासाठी रेशन कार्ड सोबत घेऊन जाण्याची गरज भासणार नाही.

दोन पानाचेच रेशन कार्ड

नियमित वापरातील ए-4 आकारातील दोन पानाचे हे रेशन कार्ड असेल. त्यावर पारंपरिक रेशन कार्डावरील सर्व माहिती नेमकेपणाने आणि सुस्पष्ट असेल. याखेरीज या कार्डवर क्यूआर कोडही असून ज्या ठिकाणी हे रेशन कार्ड वापरायचे आहे, त्याठिकाणी संबंधित कार्यालयातील अधिकार्‍यांनाही हा क्यूआर कोड स्कॅनिंग करता येणार आहे.

दुकानातही घेऊन जायची गरज नाही

दुकानातील कामकाज ई-पॉस मशिनवर चालत असल्याने पारंपरिक रेशन कार्ड दुकानात घेऊन जायची गरजच नाही. ई-कार्डचीही तशी कोणतीही आवश्यकता राहणार नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news