एस. टी. प्रवासासाठी आता करा ई-पेमेंट; आषाढीच्या पार्श्वभूमीवर नऊ आगारांच्या वाहकांना देणार अ‍ॅन्ड्रॉईड मशिन

एस.टी. प्रवास
एस.टी. प्रवास

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  एस.टी.ने प्रवास करताना प्रवासादरम्यान वाहक व प्रवाशांमध्ये सुट्ट्या पैशांसाठी सतत तक्रारी समोर येत होत्या. यावर एस.टी. महामंडळाकडून वाहकांना नवीन अ‍ॅन्ड्रॉईड तिकीट मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्या लक्षात घेता सोलापूर विभागातील नऊ आगारांतील सर्व वाहकांना या मशिनचे वाटप होणार असल्याचे सोलापूर एस.टी. विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी सांगितले.

राज्य परिवहन महामंडळाने आधुनिकतेची कास धरत मॅन्युअल तिकीट सेवा बंद करुन इलेक्ट्रिक तिकीट मशिन उपलब्ध करून दिल्या. परंतु या मशिनवर तिकीट काढताना अडचणी निर्माण होत आहेत. यावर महामंडळाने पर्याय शोधून नवीन अ‍ॅन्ड्रॉईड मशिन उपलब्ध करून देण्यासाठी इबिक्सकॅश संस्थेसोबत करार केला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व आगारांत अ‍ॅन्ड्रॉईड मशिन उपलब्ध होतील. राज्य एस.टी. महामंडळाकडून महिलांसाठी 'महिला सन्मान' योजना अंतर्गत महिलांना सरसकट पन्नास टक्के तिकिटात सवलत देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 'अमृत' योजना अंतर्गत मोफत प्रवास, त्याचबरोबर विविध सवलतीधारकांना मोठ्या प्रमाणात सवलती देऊ केल्या आहेत. त्यामुळे एस.टी.चा प्रवासीवर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच प्रवासादरम्यान तिकीट मशीन बंद पडणे, चार्जिंग नसल्याने काम न करणे, तिकिटांची रक्कम न येणे, अशा तक्रारी वाढल्या आहेत.

तिकिटासाठी सुट्ट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांमध्ये अनेक वेळा वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. या तक्रारीची दखल घेऊन राज्य एस.टी. महामंडळाने वाहकांना नवीन अ‍ॅन्ड्रॉईड मशिन देण्याचे सांगितले होते. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून मशीन अद्यापही त्या आगारांकडे प्राप्त झाल्या नसल्याने वाहक या मशिनच्या प्रतीक्षेत होते. अखेर ही प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच विभागातील प्रत्येक वाहकाकडे नवी अ‍ॅन्ड्रॉईड मशिन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे एस.टी.च्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

गुगल, फोन पे, पेटीएमद्वारे काढा तिकीट

एस.टी. महामंडळाकडून प्रवासीवर्ग वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात प्रवासादरम्यान प्रवाशांना तिकीट काढताना डिजिटल माध्यमांद्वारे तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅन्ड्रॉईड मशिनचा वापर करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना फोन पे, पेटीएम, गुगल पे यासह डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे तिकीट काढणे शक्य होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news