Mark Rutte: नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट्टे यांचा राजीनामा; स्थलांतर धोरणाच्या वादावरून आघाडी सरकार कोसळले

Mark Rutte: नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट्टे यांचा राजीनामा; स्थलांतर धोरणाच्या वादावरून आघाडी सरकार कोसळले

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्थलांतर धोरणाबाबत सहमती न झाल्याने नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट्टे (Mark Rutte) यांनी आघाडी सरकारच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आज (दि.८) राजा विलेम-अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन निवडणुका होईपर्यंत सर्व मंत्री काळजीवाहू मंत्रिमंडळ म्हणून काम करत राहतील, असेही त्यांनी सांगितले.

स्थलांतर धोरणावरून सरकारमधील सहभागी पक्षांमध्ये मतभेद झाल्यानंतर डच सरकार कोसळले. रुट्टे (Mark Rutte) यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत चार मित्रपक्षांमध्ये सहमती होऊ शकली नाही. रुट्टे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार दीड वर्षापूर्वी स्थापन झाले. मात्र, काही काळापासून स्थलांतर धोरणावरून सरकारमध्ये सहभागी पक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले होते. परिणामी मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीनंतर शुक्रवारी संध्याकाळी माध्यमांशी बोलताना रुट्टे यांनी सरकार कोसळल्याचे सांगितले.

मीडियाच्या सूत्रांनुसार, रुट्टेची व्हीव्हीडी पार्टी गेल्या वर्षी निर्वासित शिबिरांवरून झालेल्या वादानंतर निर्वासितांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत होती. नेदरलँड्समध्ये निर्वासितांची 47 हजारहून अधिक संख्या झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने सांगितले होते की, निर्वासितांकडून सुमारे 70 हजार अर्ज येऊ शकतात.

पंतप्रधान रुट्टे यांच्या सरकारने या आठवड्यात नेदरलँड्समधील युद्ध निर्वासितांच्या नातेवाईकांची संख्या दरमहा 200 लोकांपर्यंत मर्यादित ठेवण्याची तरतूद असलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्रपक्षांनी याला कडाडून विरोध केला. हा निर्णय आपल्यासाठी खूप कठीण असल्याचे सांगत रुट्टे यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा जाहीर केला. ते म्हणाले, सरकारमधील सहभागी पक्षांतील मतभेद दूर करता येणार नाहीत. ते म्हणाले की, सर्व बाजूंनी तोडगा काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, दुर्दैवाने स्थलांतर धोरणावरील मतभेद दूर करणे अशक्य आहे.

दरम्यान, नेदरलँड्समध्ये पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ काम करण्याचा विक्रम ५६ वर्षीय रुट्टे यांच्या नावावर आहे. 2010 पासून ते या पदावर आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news