Dussehra : विविधतेने नटलेला दसरा!

Dussehra : विविधतेने नटलेला दसरा!

आपल्या देशात साजर्‍या केल्या जाणार्‍या अनेक उत्सवांना केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वच आहे असे नव्हे, तर अनेक सणांना एक ऐतिहासिक परंपरा आहे. विजयादशमी म्हणजे दसर्‍याचा सणही आपल्या देशात विविध भागांत वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मात्र, पद्धती वेगळ्या असल्या, तरी चांगल्याचा विजय आणि वाईटाचा पराजय हीच दसरा साजरा करण्यामागील मुख्य भावना सर्वत्र समान असल्याचे पाहायला मिळते. दसरा साजरा करण्याची कोणत्या प्रांतात कोणती परंपरा आहे, यावर एक द़ृष्टिक्षेप…

भारतातील विविधता केवळ पोशाख किंवा खाण्या-पिण्याच्या जिन्नसांपुरती सीमित आहे असे नाही, तर श्रद्धा आणि परंपरांच्या बाबतीतही भारतात मोठी विविधता आढळते. ही परंपरा विविधरंगी आहे. देवीची पूजा आणि दसरा हे दोन असे उत्सव आहेत, ज्यात सर्वाधिक वैविध्याचे दर्शन आपल्याला घडते. हे दोन उत्सव परंपरेनुसार साजरे केले जात नाहीत, असा प्रांतच देशात नाही. याचे मुख्य कारण असे की, वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणूनच दसरा साजरा केला जातो. परंतु, हा विजय व्यावहारिक स्वरूपात जेव्हा साजरा केला जातो, तेव्हा प्रांतानुसार संदर्भ बदलतात. त्यामुळेच हा सण विविधरंगी बनला आहे. देशाच्या विविध भागांत अगदी वेगळ्या ढंगात दसरा साजरा केला जातो. या सेलिब्रेशनचा आनंद केवळ देशवासीयच नव्हे, तर परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने घेतात, त्याच्या मुळाशी हीच विविधता आहे. विविधतेतील एकता हेच भारताचे वैशिष्ट्य असून, तेच बलस्थानही आहे. या विविधतेचा एकाच दिवशी होणारा अनेकरंगी आविष्कार दसर्‍याला पाहायला मिळतो.

स्थानिक परंपरांमुळे दसरा प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांमध्ये हिमाचल प्रदेशातील कुल्लूचा प्रामुख्याने समावेश होतो. कुल्लूचा दसरा जगप्रसिद्ध आहे. येथील दशहरा उत्सव दसर्‍याच्या दिवशी सुरू होतो आणि पुढे सात दिवस चालतो. परंतु, देशाच्या इतर भागांमध्ये ज्याप्रमाणे रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, ती प्रथा येथे नाही. या उत्सवात वेगवेगळ्या समूहांमधील लोक आपापल्या इष्ट देवतांच्या मूर्ती घेऊन रघुनाथजींच्या भेटीसाठी ढालपूरपर्यंत जातात. उत्सवाच्या दिवशी वेगवेगळ्या समूहांंमधून आलेले लोक एकाच ठिकाणी एकत्र जमतात आणि त्यांचा एक मोठा समूह तयार होतो आणि व्यास नदीकिनारी जातो. त्या ठिकाणी रचलेल्या लाकडाच्या ढिगाला रावणाची लंका मानून त्याचे दहन केले जाते. लंका तर सोन्याची होती. म्हणजेच मोहनगरी. याचाच अर्थ, या ठिकाणी मोह हे वाईटाचे प्रतीक मानून त्याचे दहन केले जाते.

काशी हे हिंदूंचे सर्वांत महत्त्वाचे पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. तसे पाहायला गेल्यास ही भगवान विश्वनाथांची नगरी. परंतु, विजयादशमीचा उत्सव येथे केवळ धूमधडाक्यातच नव्हे तर खास बनारसी शैलीत साजरा केला जातो. विजयादशमीला खास रेशीम आणि जरीच्या वस्त्रांनी सजविलेल्या काशी नरेशांची हत्तीवरून मिरवणूक काढली जाते. हत्तीच्या मागे खूप मोठी मिरवणूक असते. प्रचंड गर्दी जमलेली असते. ही मिरवणूक ज्या स्थळी जाऊन थांबते, त्या रामनगरमध्ये काशी नरेशांच्या हस्ते महिनाभर चालणार्‍या रामलीलांचे उद्घाटन केले जाते. राजस्थानच्या दक्षिणेकडे हाडौती क्षेत्रातील कोटा शहर आधुनिक काळात शिक्षणाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले असले, तरी कोटा शहराला प्रसिद्ध शहरांच्या पंक्तीत नेऊन बसविणारी एक महान परंपरा लाभली आहे. ती म्हणजे दसर्‍यादिवशी येथे भरणारा दशहरा मेला. कोटा येथे विजयादशमीला मोठी यात्रा भरते.

भव्यता आणि जमणार्‍या गर्दीच्या बाबतीत देश-विदेशात प्रसिद्ध आहे. कोटा यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी दरवर्षी एक लाखाहून अधिक देशी-विदेशी पर्यटक येथे हजेरी लावतात. दरोडेखोरांच्या वास्तव्यामुळे चर्चेत असणार्‍या चंबळ नदीच्या पूर्व किनार्‍यावर कोटा शहर वसले असून, आग्नेयेपासून वायव्येपर्यंत मुकुंदरा पर्वतराजी पसरलेली आहे. याच ठिकाणी दसर्‍याच्या दिवशी यात्रा भरते. ऐतिहासिक माहितीनुसार, कोटा शहर बाराव्या शकतात जेव्हा चौहान वंशाच्या कब्जात आले, तेव्हा चौहानवंशीयांनी बुंदी ही आपली राजधानी बनविली. 1614 मध्ये मुघल बादशहा जहाँगीरने बुंदीचे राजकुमार माधोसिंह यांच्या शासनकाळात कोटा हे बुंदीपासून एक स्वतंत्र राज्य बनविले. 1818 मध्ये कोटा शहर ब्रिटिश साम्राज्यात समाविष्ट झाले. तोपर्यंत ते स्वतंत्र राज्य होते. कोटा शहराला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही जत्रा भरविली जाते. आज एक या यात्रेला एका मोठ्या सांस्कृतिक यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

म्हैसूरचा दसरा कुल्लूच्या दसर्‍याइतकाच प्रसिद्ध आहे. सुमारे सहा शतकांच्या आधीपासूनची परंपरा या दसरा उत्सवाला लाभली आहे, असे सांगितले जाते. दसर्‍याच्या उत्सवात येथील वातावरण चैतन्यपूर्ण असते. लोक घरात न राहता जणू संपूर्ण शहरालाच घर बनवितात आणि एकत्र येऊन हा उत्सव साजरा करीत आहेत, असा भास होतो. विजयादशमीच्या सणाला संपूर्ण शहर फुलांनी, दिव्यांनी आणि रोषणाईने सजविले जाते. चामुंडी डोंगरावरील चामुंडेश्वरीच्या पूजेने दसरा उत्सवाची सुरुवात होते. त्याच ठिकाणी दीपप्रज्वलनही केले जाते. या उत्सवादरम्यान म्हैसूर शहर 97 हजार विद्युत दिव्यांनी तर चामुंडी डोंगर सुमारे 1 लाख 63 हजार विद्युत दिव्यांनी सजविला जातो. विविधतेतील एकता म्हणजेच भारतीय संस्कृती आणि परंपरा होय.

शहर असो वा खेडेगाव, शारदीय नवरात्रौत्सव सुरू होण्याच्या कितीतरी आधीपासूनच दसर्‍याची तयारी सुरू झालेली असते. रावण, मेघनाद आणि कुंभकर्ण यांचे विशाल पुतळे तयार करण्यासाठी लगबग सुरू होते. या पुतळ्यांत फटाके आणि फटाक्यांची दारू भरली जाते. प्रभू रामचंद्रांनी विजयादशमीच्या दिवशीच रावणावर विजय प्राप्त केला होता. याच दिवसाचे स्मरण म्हणून रामाची भूमिका करणारे कलावंत रावणाच्या नाभीमध्ये अग्निबाण मारतात. रावणाच्या नाभीला बाण लागताक्षणी पुतळ्यातील फटाके फुटायला सुरुवात होते, अशा प्रकारे वाईटावर चांगल्याचा विजय मिळविल्याचा उत्सव साजरा केला जातो. चांगल्या-वाईटाचे संदर्भ प्रांतानुसार बदलत असले, तरी दसरा साजरा करण्यामागील मुख्य भावना सुष्टाचा विजय आणि दुष्टाचा पराजय हीच आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news