Jejuri Dasara : तब्बल १८ तास रंगला जेजुरीचा मर्दानी दसरा सोहळा

Jejuri Dasara : तब्बल १८ तास रंगला जेजुरीचा मर्दानी दसरा सोहळा
Published on
Updated on

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : खंडोबा देवाच्या तीर्थक्षेत्र जेजुरीनगरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वातावरणात मर्दानी दसरा साजरा झाला. सलग १८ तास जेजुरी गड, जयाद्री डोंगर खोरे तसेच जेजुरी नगरीत दसरा सोहळा रंगला. 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष, भंडाऱ्याची उधळण, हवाई फटाक्यांची आतषबाजी, तलवारीच्या स्पर्धा, मानकरी, सेवेकरी आणि कलावंत यांचा मानपत्र देवून सन्मान यावेळी झाला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

मंगळवारी (दि. २४) दसऱ्याच्या दिवशी पहाटे जेजुरी गडावर श्री. खंडोबा व म्हाळसादेवीचे घट उठविण्यात आले. महापूजा, अभिषेक, महाआरतीने दसरा उत्सवाला सुरुवात झाली. जेजुरी देवसंस्थान आणि मानकऱ्यांच्या हस्ते जेजुरी गड, नगारखाना, शस्त्रे आदींचे पूजन करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता देवाचे मानकरी पेशवे, खोमणे पाटील, माळवदकर यांनी इशारा करताच पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. बंदुकीच्या फैरीने सोहळ्याला सलामी देण्यात आली. पालखीने मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर भंडार गृहातील श्री. खंडोबा व म्हाळसा देवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आली आणि दसरा पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. गडावरून हा सोहळा निघताच हजारो भाविकांनी देवाचे लेणं असणाऱ्या भंडाऱ्याची उधळण केली. मावळतीच्या प्रहारीला या उधळणीने जेजुरी गडाला सुवर्ण नगरीचे स्वरूप आले होते.

दरम्यान, रात्री ९ वाजता खंडोबा देवाचे मुळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा ही सीमोल्लंघणासाठी निघाला. घडशी समाजाचे सोलो वादन, जेजुरीतील कलावंतांचा व वाघ्या मुरुळीचा देवाच्या पालखीसमोर जागर तसेच विविधरंगी शोभेच्या दारूकामामुळे तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सोहळ्याला एक ऐतिहासिक स्वरूप लाभले होते. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास रमणा या देवभेटीच्या स्थळी डोंगर व दरीत जेजुरी गड व कडेपठार गडावरील पालखी समोरासमोर आणण्यात आल्या. देव भेटीसाठी देवाची आराधना करण्यात आली. यावेळी एक तास हवाई फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी करण्यात आली. देवभेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी मध्यरात्री हजारो भाविक व नागरिक उपस्थित होते.

देवभेटीनंतर पेशवे तलवाकाठी आपटा पूजन करून उत्सवमूर्तींचा स्पर्श आपट्याच्या झाडाला करण्यात आला आणि सोनं लुटण्यात आले. पहाटे सहा वाजता जेजुरी नगरीत पालखी सोहळ्यचे आगमन झाले. शहरात सडा-रांगोळी घालून देवाचे औक्षण करून आणि पारंपारिक भुईनुळे उडवून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. नंदी चौकात व ठिकठिकाणी धनगर भाविक पारंपारिक गीते गात व नाचत होते. नंदी चौकात धनगर बांधवांनी लोकरीची उधळण पालखीवर केली. वजनाने प्रचंड जड असणारी पालखी खांद्यावर पेलवत खांदेकरी यांनी गड चढला. सकाळी सात वाजता सोहळा गडावर पोहचला.

येथेही कलावंतांनी देवासमोर आपल्या कलेची हजेरी सादर केली. सकाळी १० वाजता रोजमुरा वाटप करून पालखी सोहळ्याची सांगता झाली. पालखी सोहळा समितीचे पदाधिकारी, खांदेकरी, मानकरी, पुजारी सेवक वर्ग व ग्रामस्थांनी हा मर्दानी पालखी सोहळा पार पाडला. देवसंस्थानच्या वतीने खंडोबा देवाचे नित्य सेवेकरी, कलावंत, पालखी सोहळ्याचे खांदेकरी, मानकरी यांना मानपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे, विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, अनिल सौंदडे, मंगेश घोणे, डॉ. राजेंद्र खेडकर, विश्वास पानसे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. याचे नियोजन व्यवस्थापक राजेंद्र जगताप, सतीश घाडगे व अधिकारी कर्मचारी वर्गाने केले.

तलवार स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
जेजुरी गडावर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी होणारी ४२ किलो वजनाची तलवार उचलणे व कसरती करण्याची स्पर्धा आता देश विदेशात प्रसिद्ध झाली आहे. खंडा (तलवार) तोलून धरण्याच्या स्पर्धेत अंकुश गोडसे याने ११ मिनीट ४९ सेकंद खंडा तोलून प्रथम क्रमांक मिळवला. अमोल खोमणे (९ मिनीट ३८ सेकंद), हेमंत माने (७ मिनीट ३४ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावले. सुहास खोमणे, मंगेश चव्हाण, गिरीश घाडगे, संदीप दोडके यांनी इतर पारितोषिके पटकाविली.

कसरतीच्या स्पर्धेत नितीन कुदळे प्रथम
कसरतीच्या स्पर्धेत नितीन कुदळे याने प्रथम तर विशाल माने याने दूसरा क्रमांक आणि प्रवीण गोडसे याने तिसरा क्रमांक मिळवला. शिवाजी राणे, सचिन कुदळे, चेतन कुदळे, विजय राऊत, मयूर केंजळे यांनी या स्पर्धेतील इतर बक्षिसे पटकाविली. या स्पर्धेचे पंच म्हणून माजी विश्वस्त सुधीर गोडसे, श्री खंडोबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, सोमनाथ उबाळे, माउली खोमणे यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news