पर्यावरण : गुदमरणारी महानगरे

पर्यावरण : गुदमरणारी महानगरे
Published on
Updated on

देशातील शहरा-महानगरांमध्ये वेगाने वाढत चाललेल्या वायू प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत चालली आहे. मध्यंतरी दिल्लीतील हवेची चर्चा अगदी जगभरात झाली. परंतु ताज्या पाहणीनुसार मुंबई आणि पुण्याची हवा दिल्लीपेक्षाही खराब असल्याचे दिसून आले आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 146 वर, तर पुण्याचा 178 वर गेला आहे. हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार वाढत आहेत. यामागची कारणे सर्वश्रुत असूनही आपली धोरणे आणि भूमिका प्रदूषणास हातभार लावणारीच आहे.

एकविसाव्या शतकामध्ये संपूर्ण मानवजातीपुढे सर्वात मोठे आव्हान बनलेल्या जागतिक तापमानवाढीबाबत सबंध जगभरातील पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता आहे. तथापि, तापमानवाढीचे मुख्य कारण असणारे वायू प्रदूषण रोखण्याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीयेत. उलटपक्षी, विकासाच्या लालसेपोटी आणि आधुनिकता, चंगळवाद यामुळे बदललेल्या जीवनशैलीच्या गरजा भागविण्यासाठी सुरू असलेल्या गोष्टींमुळे वायू प्रदूषण दिवसागणिक वाढत चालले आहे. विशेषतः देशातील आणि जगभरातील महानगरे-शहरांची स्थिती अधिक भयावह होताना दिसत आहे. मध्यंतरीच्या काळात देशाची राजधानी दिल्लीमधील प्रदूषित हवेमुळे तेथील नागरिकांचे जगणे असह्य झाल्याची चर्चा देशभरात नव्हे, तर जगभरात झाली. परंतु अलीकडेच झालेल्या एका पाहणीनुसार, महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई या दोन महानगरांमधील हवा दिल्लीहून अधिक खराब झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 146 वर, तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक 178 वर गेल्याचे यामधून दिसून आले आहे. अलीकडील काळात सर्वाधिक प्रदूषित शहरांबाबत जागतिक स्तरावरून जाहीर होणार्‍या यादीत सुरुवातीच्या 10-15 शहरांमध्ये भारतातील शहरांचा समावेश अधिक असल्याचे दिसत आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पण राज्यकर्ता वर्गाची याबाबत उदासीनताच दिसून येते.

वायू प्रदूषणाबरोबरच भारतीय शहरांमध्ये धूलिकणांचे प्रमाण वाढत चालले आहे. याबाबत मुंबईमध्ये अलीकडेच एक प्रयोग करण्यात आला. पॉलिहाऊसमध्ये विशेषतः ऑर्किडचे कल्टिवेशन असणार्‍या ग्रीनहाऊसमध्ये हवेतील आर्द्रता वाढविण्यासाठी फॉगर बसवलेले असतात कारण ऑर्किड हवेतील बाष्प शोषून घेत असल्यामुळे तेथील हवेचे तापमान वाढते. हे फॉगर धुके तयार करतात. अशा प्रकारचे फॉगर मुंबईमध्ये काही ठिकाणी बसविण्यात आले होते आणि त्यातून धुके तयार करण्यात आले. या धुक्यामुळे हवेतील धूलिकण खाली बसण्यास मदत झाली. हिवाळ्यामध्ये धुके पडते तेव्हा या दाट थरामध्ये स्मॉग तयार होतो. स्मॉग म्हणजे दूषित हवा आणि आर्द्रता यांचे मिश्रण. हा स्मॉगचा थर श्वसनासाठी अत्यंत घातक असतो कारण या आर्द्रतेमुळे हवेतील दूषित कण श्वसनाद्वारे नाकात आणि फुप्फुसात जातात. तशाच प्रकारे हवेमध्ये वाढणारे धूलिकणांचे प्रमाणही आरोग्यासाठी घातक असते.

आपल्याकडे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खराब रस्ते. कारण रस्त्यांवर सर्वाधिक प्रमाणात धूळ तयार होते. आज सबंध देशभरात रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अंतर्गत रस्ते असोत किंवा महामार्ग असोत, यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आज देशातील सर्वच शहरांमध्ये रस्त्यांची स्थिती बिकट आहे. अशा खराब रस्त्यांवरून वाहने गेल्यामुळे धूळ हवेत पसरत आहे. आज पावसाळा संपून इतके दिवस उलटूनही रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. नागरिकांनी तक्रार केली तर दुरुस्ती म्हणून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीयुक्त खडी टाकली जाते. पण अशा बुजवलेल्या खड्ड्यांवरून वाहने गेल्यानंतर त्यातील धूळ हवेत पसरते. वास्तविक, खराब झालेल्या रस्त्यांचे लागलीच डांबरीकरण केले पाहिजे; पण ते केले जात नाहीये. धूलिकणांचे प्रमाण वाढण्यामागचे दुसरे एक कारण म्हणजे वाढती बांधकामे. आज देशातील प्रत्येक शहरांत घरबांधणीचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. महानगरांमध्ये जुनी घरे, इमारती पाडून रिडेव्हलपमेंट करण्याचे प्रमाण अधिक आहे. यातूनही हवेतील धुळीचे प्रमाण वाढत आहे.

याखेरीज वायू प्रदूषण वाढण्यास वाढती वाहन संख्या आणि त्यांचा अतिवापर हे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणून पुढे आले आहे. गेल्या चार ते पाच दशकांचा विचार करता, अलीकडील काळात देशातील वाहनांच्या संख्येने खूप मोठी उडी घेतल्याचे दिसते. 2022 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण वाहनांची संख्या 326.3 दशलक्ष इतकी होती. यामध्ये दुचाकी वाहनांचे प्रमाण 75 टक्के होते. 2019 ते 2022 या काळात देशात दोन कोटींहून अधिक नव्या वाहनांची नोंदणी झाली. आज देशातील दुचाकींचा आकडा 21 कोटींहून अधिक आहे; तर चारचाकींचा आकडा 7 कोटींहून अधिक आहे. याखेरीज हायब्रीड वाहनांची संख्या सुमारे 17 लाख इतकी आहे. 2009 मध्ये भारतीय वाहन उद्योगाने एकूण 26 लाख वाहनांची निर्मिती केली होती. कोव्हिडोत्तर काळात वाहन उद्योगाने घेतलेली भरारी पाहिल्यास आज देशात विक्रमी पातळीवर वाहनांची विक्री होत आहे. एका पाहणीनुसार 2050 पर्यंत भारतीय रस्त्यांवर 61.1 कोटी वाहने धावताना दिसतील आणि ही संख्या जगातील सर्वाधिक वाहन संख्या असेल. आज महाराष्ट्राचा विचार केल्यास सलग दोन-तीन दिवसांच्या सुट्ट्या जोडून आल्यास महामार्गांवर प्रचंड मोठी वाहनकोंडी होते. याचा अर्थ, वाहनांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांचा वापरही वाढलेला आहे. या वाहनांमधून होणारे कार्बन उत्सर्जन हवेची गुणवत्ता खराब करण्यामध्ये प्रचंड मोठी भर घालत आहे. या वाढत्या वाहनसंख्येवर शासनाचे कसलेली नियंत्रण नाही. उलट, वाहन संख्या वाढत चालल्यामुळे रस्ते अपुरे पडू लागले म्हणून शासन झाडांच्या कत्तली करून रस्त्यांची निर्मिती व विकास करत आहे.

या सर्वांचा अर्थ, वायू प्रदूषण वाढविण्यास सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. कोरोनाच्या काळात वाहनखरेदीचा वेग अत्यंत मंदावला होता. पण गेल्या वर्षभरातील आकडेवारी पाहिल्यास प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी होत आहे. सप्टेंबर महिन्यात भारतातील वाहन विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ 20 टक्क्यांनी अधिक असून हा आकडा 18.9 लाखांवर पोहोचला आहे. आज एकट्या पुण्यामध्ये 44 लाखांहून अधिक वाहने रस्त्यावर दररोज धावत आहेत. 70 लाख लोकसंख्या असणार्‍या या शहरात नोंदणी न झालेल्या वाहनांची संख्याही मोठी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहने वाढणार असतील तर शुद्ध हवा कशी मिळणार? चारचाकी वाहनांमधील व्यक्ती काचा बंद करुन एसीमध्ये बसलेल्या असतात. पण त्या वाहनातून होणार्‍या विषारी वायूउत्सर्जनाचा त्रास सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. शासन व्यवस्था महसुलाचा विचार करुन वाहनसंख्येवर बंधने आणणारी नियमावली जाहीर करण्याचा खटाटोपही करत नाही. वास्तविक, पाच जणांच्या कुटुंबाकडे किती वाहने असावीत, याबाबत काही नियम असावेत का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या वायूप्रदुषणामुळे स्वच्छ, शुद्ध हवा न मिळाल्यामुळे अनेक प्रकारचे आजार जडत आहेत. आजच याबाबत कठोर उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर भविष्यात खूप भीषण संकट ओढावणार आहे.

हवेतील कार्बन डाय ऑक्साईड शोषण्याचे काम झाडांकडून केले जाते. धूळ झाडांकडून शोषली जात नसली तरी ती पानांवर चिकटून राहते. त्यामुळे झाडांमुळे धुळीकणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच कार्बन डाय ऑक्साईडचे शोषण करुन झाडे ऑक्सिजन देत असतात. असे असताना आज महानगरांच्या बाजूला झाडांची संख्या किती आहे? पुणे-बंगळुरु महामार्गाचा विचार केल्यास हा रस्ता तयार करत असताना हजारो जुने, डेरेदार, सावली देणारे वृक्ष तोडण्यात आले. रस्तानिर्मितीनंतर बाजूला पुन्हा रोपांची लागवड करण्यात आली; पण 20-22 वर्षांनंतर ही वाढलेली झाडे रुंदीकरणासाठी पुन्हा तोडण्यात आली. चौपदरी, सहा पदरी, आठपदरी, बारापदरी अशा मार्गाने रस्तेविकास करताना कार्बन शोषणार्‍या झाडांचा विचारच केला जात नाही. किंबहुना, आज अशी स्थिती आहे की रस्तेविकास आणि रुंदीकरणामुळे झाडे लावण्यासाठी जागाच उरलेली नाही. रस्त्यावरची झाडांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदुषण कमी करणारी नैसर्गिक व्यवस्थाच उद्ध्वस्त झाली आहे. याखेरीज शहरांमध्ये कारखानदारीमुळेही मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण होत आहे.

आज प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वाहनसंख्या वाढल्यामुळे रस्तेविकास करण्याखेरीज पर्याय नाहीये. त्यामुळे विकासाच्या नावाखाली विस्तारीकरण केले जात आहे. रस्त्याकडेला झाडे लावण्यासाठी जागा नसल्यामुळे आता एक नवे फॅड निर्माण झाले आहे. अनेक शहरांमध्ये मोकळ्या भिंती, चौक किंवा फ्लायओव्हरच्या भिंतींवर व्हर्टिकल फार्मिंग केले जात आहे. वास्तविक, ही संकल्पना प्रचंड महागडी असून त्याचा मेंटेनन्सही खूप आहे. तसेच या व्हर्टिकल गार्डनमध्ये लावण्यात येणारी झाडे ही प्रामुख्याने सावलीत वाढणारी आहेत आणि ती विदेशी आहेत. त्यामुळे हा सर्व प्रकल्प महाप्रचंड खर्चिक आहे. यापेक्षा रस्त्याकडेला झाडे लावण्याचा शाश्वत आणि कमी खर्चिक पर्याय का अवलंबला जात नाही? व्हर्टिकल गार्डन ही संकल्पना थंड हवेच्या प्रदेशासाठी योग्य आहे. आपला उष्णकटिबंधीय देश आहे. आपल्याकडे तापमान प्रचंड असते.

अशा वेळी या व्हर्टिकल फार्मिंगमधील झाडे टिकणार कशी हाही प्रश्न आहे. त्याऐवजी मोठमोठाल्या कुंड्यांमध्ये देशी झाडे लावण्याचा पर्याय रास्त आणि व्यवहार्य ठरणारा आहे. ही झाडे आपल्या वातावरणात टिकतातही चांगली. त्याऐवजी एक्झॉटिक किंवा विदेशी झाडे आणण्यासाठी पैशांची उधळपट्टी करण्यामध्ये शासन-प्रशासनाचे नेमके काय अर्थकारण दडलेले आहे, हे जनता जाणून आहे. पण सुशोभिकरणाच्या नावाखाली सुरू असलेली दिशाभूल पर्यावरणपूरक नाही हे लक्षात घ्यायला हवे. मुळात विदेशी झाडांची लागवड करण्याचा जो प्रवाह रुढ होत आहे त्यामागे निव्वळ नफेखोरीचे अर्थकारण दडलेले आहे. या झाडांविषयी अत्यंत चुकीची माहिती पसरवली जात आहे. ही झाडे 24 तास ऑक्सिजन देतात अशा प्रकारच्या गैरसमजुती पसरवल्या जात आहेत.

वास्तविक, सदासर्वकाळ ऑक्सिजन देणारे एकही झाड या भूतलावर नाहीये. पण आपली एकंदरच निसर्गाबाबतची समजच मर्यादित असल्यामुळे अशा नफेखोरांचे फावते. प्रत्यक्षात त्यातून काहीही हाताशी लागणार नाही. आपल्याला वायूप्रदूषण कमी करायचे असेल तर वाहनसंख्या, रस्तेविकास आणि कारखाने यांच्यावर नियंत्रणाबाबत व्यापक धोरण आखावेच लागणार आहे. पण ज्याप्रमाणे लोकसंख्या नियंत्रणाबाबत जसे कोणी बोलत नाही तसेच याबाबतही कुणी बोलताना दिसत नाही. त्याचबरोबर जंगलतोडीबाबतही राज्यकर्त्यांची भूमिका पर्यावरणपूरक नाहीये. भारतात दरवर्षी 14 लाख हेक्टर जमिनीवरची जंगले नष्ट होत आहेत.

वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत असताना लागवड फार कमी प्रमाणात आहे. म्हणजेच याबाबत कुठेही समन्वय नाही असे दिसते. त्यामुळे कारखान्यातून, वाहनांमधून बाहेर पडलेला कार्बनडाय ऑक्साईड हा वनस्पतींकडून शोषला वा वापरला जात नाही. पूर्वी जंगले जास्त असल्यामुळे कार्बनडाय ऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण कमी होते. परंतु आता ते 33 टक्क्यांनी जास्त झाले आहे आणि हाच वायू जागतिक तापमान वाढीस मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. सारांश, मानव आपल्या वाढलेल्या गरजांच्या पूर्तता करण्यासाठी विकासाच्या गोंडस नावाने विनाशाकडे वाटचाल करत आहे. वातावरणातील कार्बनचे प्रमाण आजच्याच गतीने वाढत राहिले तर भविष्यात अकल्पित संकटांचा सामना करावा लागणार आहे. त्यावेळी गुदमरणार्‍या शहरांमध्ये राहणेही अवघड होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news