क्रूजवरील ड्रग्ज पार्टीवरील कारवाईत अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांनी उल्लेख केलेला दाढीवाला अर्थात काशिफ खान (kashif khan drug party) याने प्रतिक्रिया दिली असून मी वानखेडेंना ओळखत नाही. तरीही मलिक असा का दावा करत आहेत हेच कळत नाही, असे तो म्हणाला. मलिक यांनी केलेले सर्व दावे त्याने फेटाळून लावले.
क्रूजवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन आणि त्यांच्या मित्रांना एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण वादग्रस्त बनले होते. या प्रकरणात मलिक यांनी एनसीबीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्टीत क्रूजवर असलेला दाढीवाला कोण असे म्हणून त्यांनी सस्पेन्स वाढविला होता. या दाढीवाल्यासोबत एक महिला नृत्य करत असून तिच्या हातात पिस्तूल असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. याबाबत काशिफ खान याने खुलासा केला आहे.
तो म्हणाला, 'नवाब मलिक यांच्याकडे अपुरी आणि चुकीची माहिती आहे. माझा कोणत्याही ड्रग्जच्या व्यवहाराशी संबंध नाही. मी सिगारेटही ओढत नाही. या गोष्टी मला ओळखणाऱ्या सर्व लोकांना माहीत आहेत. माझ्यावरील सर्व आरोप पूर्णपणे निराधार, चुकीचे आहेत. मी त्यांना ओळखत नाही, मी कधीही त्यांना भेटलेलो नाही. मला या प्रकरणात का ओढत आहेत हेच मला कळत नाही. त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला आहे.'
दरम्यान, काशिफ खान यांच्यासोबत व्हिडिओत नृत्य करणाऱ्या महिलेजवळ शस्त्र होते. या आरोपावर तो म्हणाला, 'क्रूजवर जाताना सीआयएसएफची सुरक्षा पार करून एक साधी टॉय गन देखील कुणी घेऊन जाऊ शकत नाही. असं बोलणं मला निरर्थक आणि वेळ वाया घालवणारे आहे. यावर चर्चादेखील करू नये असे मला वाटते. क्रूजसाठी जी सरकारी सुरक्षा एजन्सी होती, त्यांनाच हे विचारायला हवे की हे कुठून आले.'
एनसीबीचे झोनल ऑफिसर समीर वानखेडे हे काशिफ खानचे घनिष्ट मित्र असल्याचा आरोप नबाब मलिक यांनी केला होता. त्यावर काशिफ खान म्हणाला, 'मी समीर वानखेडेला ओळखत नाही. नवाब मलिक विनाकारण हे आरोप करत आहेत. ते कशासाठी बोलत आहेत? हे त्यांना विचारलं पाहिजे. समीर वानखेडेंशी कधीही मैत्री, चर्चा, भेट झालेली नाही. मुळात मी या कार्यक्रमाचा आयोजक नव्हतो. क्रूजवरील सर्व गोष्टींसाठी मी क्रेडिट कार्डमधून पैसे भरले आहेत. माझ्याकडे सर्व बिले आहेत. क्रूजवर पोस्टरमध्ये दोन नावे होती. एक एफटीव्ही आणि दुसरं जॉनी वॉकर. एखाद्या कार्यक्रमात काही अनुचित घडले असेल तर स्पॉन्सरना जबाबदार धरणार का? असा सवालही केला.
हेही वाचा :