हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांत दुष्काळ जाहीर

हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांत दुष्काळ जाहीर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांतील 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यांचा समावेश आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळ जाहीर करण्यास मान्यता देण्यात आल्यानंतर त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला. त्यापैकी 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. राज्यातील उर्वरित

तालुक्यांमधील ज्या मंडलांमध्ये कमी पाऊस झाला आहे, त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसद़ृश परिस्थिती जाहीर करावी, तसेच या मंडलांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार दुसर्‍या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल.

मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीकपाणी परिस्थितीचा आढावा सादर करताना 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव ठेवला. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत.

राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या 13.4 टक्के घट आली असून रब्बी पेरण्यादेखील संथपणे सुरू आहेत. आतापर्यंत 12 टक्के पेरण्या झालेल्या आहेत, अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news