पुणे; वृत्तसंस्था : शत्रूशी थेट मुकाबला करण्यासाठी 'डीआरडीओ'ने विकसित केलेली आणि पूर्णपणे स्वदेशी बनावटीची घातक 'उग्रम' ही अॅसॉल्ट रायफल आज जगासमोर आणण्यात आली. आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट आणि हैदराबादच्या एका खासगी कंपनीच्या मदतीने ही रायफल विकसित करण्यात आली आहे. वजनाला हलकी; पण अधिक घातक अशी ही रायफल लवकरच लष्कराच्या शस्त्रसाठ्यात दाखल होत आहे. ही रायफल सध्याच्या एके 203 रायफलीला पर्याय असेल.
'डीआरडीओ'च्या आर्मामेंट अँड कॉम्बॅट इंजिनिअरिंगचे महासंचालक शैलेंद्र गाडे यांच्या हस्ते या 'उग्रम' रायफलीचे अनावरण करण्यात आले. भारतीय लष्कराने आपल्याला अॅसॉल्ट रायफलमध्ये काय हवे आहे, याच्या अनेक सूचना केल्या होत्या. त्यांचा अभ्यास केल्यानंतर 'डीआरडीओ'च्या संशोधकांनी हैदराबादेतील एका खासगी उद्योगाच्या मदतीने या रायफलची निर्मिती केली आहे.
सध्या भारतीय लष्कराकडे एके 203 रायफली आहेत. बहुतेक सर्व मोहिमांत त्यांचा वापर केला जातो; पण युक्रेन युद्धामुळे या रायफलींची टंचाई निर्माण झाली असून, त्याला उत्तम पर्याय म्हणून 'उग्रम' रायफल समोर आली आहे.
आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट अर्थात 'एआयडीई'चे संचालक ए. राजू म्हणाले की, आम्ही या रायफलीचे डिझाईन केले. खासगी उद्योगाच्या सहकार्याने तिची निर्मिती करण्यात आली आहे. या रायफलीच्या शास्त्रशुद्ध चाचण्यांना आता प्रारंभ होणार आहे. त्यातील निष्कर्ष समाधानकारक आल्यावर प्रत्यक्ष लष्कराकडून त्याची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर या रायफलींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाईल.