पुणे; पुढारी वृत्तसेवा : संवेदनशील शासकीय गुप्त माहिती शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला पुरविल्याप्रकरणी पुणे दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अटक केलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) शास्त्रज्ञाच्या चौकशीत त्याने विदेशवारी केल्याची माहिती समोर आली आहे. या काळात तो पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या (पीआयओ) हस्तकाला भेटल्याचा संशय पुणे एटीएसने व्यक्त केला आहे.(Hony trap)
प्रदीप मोरेश्वर कुरूलकर (रेसिडेन्शिअल कॉलनी, दिघी; मूळ रा. शिक्षकनगर, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या शास्त्रज्ञाचे नाव आहे. याबाबत दिल्ली मुख्यालय येथील अॅडिशनल डायरेक्टर व्हिजिलन्स अँड सिक्युरिटी डीआरडीओचे कर्नल यांनी मुंबई येथील काळा चौकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार 13 डिसेंबर 2022 च्या पूर्वी ते 24 फेब्रुवारी 2023 यादरम्यान घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रदीप कुरूलकर डीआरडीओच्या दिघी येथे रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिस्ट (इंजिनिअरर्स) आणि डीआरडीओच्या पाषाण येथील ऑफिस ऑफ अर्नामेंट अँड कॉम्बेक्ट इंजिनिअरिंग (एसीई) येथे कार्यरत असताना हा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, कुरूलकर शासकीय कर्तव्य बजावत असताना तो पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या हस्तकाशी व्हॉट्सअॅप व्हाइस मेसेज, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात असल्याचा प्रकार समोर आला. शासकीय गुपिते पाकिस्तानला पुरविल्याचा ठपका ठेवत त्याला काल अटक करण्यात आली.
त्यातच आता कुरूलकर याने विदेशवारी केल्याने तो पीआयओच्या हस्तकाला भेटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर तो इतर राज्यांतील काही व्यक्तींशी देखील संपर्कात आल्याने त्यादृष्टीने देखील एटीएसला तपास करण्यासाठी विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी कुरूलकरला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार त्याला 9 मेपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.