भुजबळ पण नको अन् गोडसे पण नको! महायुतीकडून नाशिकच्या जागेसाठी तिसराच पर्याय?

भुजबळ पण नको अन् गोडसे पण नको! महायुतीकडून नाशिकच्या जागेसाठी तिसराच पर्याय?

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात निर्माण झालेला वाद मिटता मिटत नसल्यामुळे आता उमेदवारीसाठी तिसऱ्या पर्यायाचीही चाचपणी केली जात आहे. एकीकडे तत्काळ सर्वेक्षणाचा आधार घेतला जात असताना दुसरीकडे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि भाजपचे नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी जोरदार प्रचार सुरू केला असताना महायुतीत मात्र उमेदवार निश्चितीवरून जोरदार घमासान सुरू आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसेंना अद्याप महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळू शकलेली नाही. भाजपच्या विरोधामुळे गोडसे यांच्याऐवजी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे. नाशिकमधून भुजबळ यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, गोडसे मागे हटायला तयार नाहीत. गेल्या पंधरा दिवसांत तब्बल तीन वेळा गोडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत नाशिकची जागा शिवसेनेकडेच ठेवण्याचा आग्रह केला आहे. शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही नाशिकची जागा शिंदे गटाकडेच ठेवण्याचा आग्रह पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. उमेदवारीवरून निर्माण झालेला हा वाद मिटत नसल्यामुळे आता भाजपने तत्काळ सर्वेक्षण करून उमेदवार निश्चितीचा पर्याय आणला आहे. त्यातून उमेदवारीसाठी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व भाजपचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाकरिता महायुतीतील तिन्ही घटक पक्षांकडून लोकसभा समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यात भाजपकडून ॲड. राहुल ढिकले, शिंदे गटाकडून अजय बोरस्ते, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निफाडचे आमदार दिलीप बनकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, उमेदवार निश्चितीच्या गोंधळामुळे बोरस्ते, ढिकले या दोन समन्वयकांपैकी एकाच्या नावाचा विचार होऊ शकतो. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे.

माझ्याबाबतीत सर्व्हे चालू या विषयी मला माहिती नाही. जागा भाजपला सुटावी, अशी

आम्ही मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर महाराष्ट्र प्रभारी गिरीश महाजन जे निर्णय घेतील तो मान्य असेल. महायुतीचा उमेदवार सक्षम असणार. तो निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. – ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व.

मी उमेदवारी मागितली नाही. जागा शिवसेनेला मिळावी ही आमची आजही मागणी आहे.

या आधी दोन निवडणुकीत हेमंत गोडसे यांचे प्रचारप्रमुख म्हणून काम केले आहे. शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जे आदेश देतील त्याचे पालन करू. – अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

येत्या दोन दिवसांत महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होईल. निवडून येण्याच्या निकषावर

उमेदवार घोषित केला जाणार आहे. उमेदवारी भाजपला मिळो वा शिवसेना, राष्ट्रवादीला, पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी महायुतीतील सर्व घटकपक्ष एकजुटीने काम करतील. – लक्ष्मण सावजी, प्रदेश प्रवक्ते, भाजप.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news