प्रसूतीदरम्यान वेदनारहित भुलीबाबत गैरसमज नको

प्रसूतीदरम्यान वेदनारहित भुलीबाबत गैरसमज नको
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  प्रसूतीच्या वेळी स्त्रीला मरणप्राय यातनांमधून मुक्ती मिळावी म्हणून भूलतज्ज्ञांच्या मदतीने 'इपिड्युरल इंजेक्शन' हा खास प्रकार विकसित करण्यात आला आहे. मात्र, वेदनारहित भूल दिल्यामुळे सिझेरियनची शक्यता वाढते, बाळाला अपाय होतो, असे अनेक गैरसमज सामान्यांमध्ये पाहायला मिळतात. गैरसमज दूर होणे गरजेचे असल्याचे मत भूलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
16 ऑक्टोबर 1846 रोजी डॉ. डब्ल्यू. टी. जी. मॉर्टन यांनी इथर वापरून एका रुग्णाचे वेदनाशामक केले आणि भूलशास्त्राचा शोध लागला. त्यांच्या स्मरणार्थ 16 ऑक्टोबर हा जागतिक भूल दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. कोणत्याही रुग्णाला शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्या नंतरदेखील यातना सहन करू लागू नयेत, म्हणून सर्व जगभरातील भूलतज्ज्ञ कटिबद्ध आहेत, अशी माहिती डॉ. नंदिनी लोंढे यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली.

प्रसूतीच्या वेळी बाळाला बाहेर आणण्यासाठी गर्भाशयाचे स्नायू आकुंचन प्रसरण पावतात. स्त्रीच्या दोन मणक्यांमध्ये इपिड्युरलची पातळ नळी सरकवली जाते आणि वेगवेगळ्या मात्रेमध्ये त्यांतून औषधे देऊन वेदनाशमन केले जाते. इपिड्युुरल इंजेक्शनमुळे स्नायू सैलावतात व बाळ पुढे सरकण्याचे प्रमाण कमी होते, असा गैरसमज बर्‍याच मातांमध्ये असतो. प्रत्यक्षात, कुशल भूलतज्ज्ञ औषधाची मात्रा गरजेप्रमाणे बदलत असतात. बाळाच्या डोक्याला व्हॅक्युम कप लावणे अथवा विशिष्ट फोरसेप्स लावणे हे खास तंत्रज्ञानही वापरले जाते.

वेदनाविरहित प्रसूती करताना आईच्या पोटातील बाळावर डॉक्टर्स पूर्ण लक्ष ठेवून असतात. वेळोवेळी हृदयाचे ठोके तपासले जातात. आईला दिलेले औषध बाळापर्यंत पोहोचेपर्यंत नगण्य स्वरूपात असते आणि त्याचा प्रभाव संपलेला असतो. त्यामुळे या तंत्रज्ञानामुळे बाळाच्या आरोग्याला अपाय होतो अशी समजूत करून घेण्यास काहीच अर्थ नाही.

                           – डॉ. नंदिनी लोंढे, भूलशास्त्र विभागप्रमुख, रुबी हॉल क्लिनिक 

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news