आयकर विवरणपत्र (Tax Return) सादर करण्याची अतिअंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. बहुतेकांनी मागील डेडलाईनला रिटर्न भरलेले असेल; पण ज्यांनी भरले नसेल त्यांना दंड बसू नये, असे वाटत असेल, तर आता हाताशी केवळ 15-20 दिवस आहेत.
आयकर विवरण पत्र भरण्यासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. ऐनवेळेला यासाठी धावपळ करण्यापेक्षा ही कागदपत्रे आधीच तयार करून ठेवावीत.
* सगळ्यात आधी वेगवेगळ्या प्रकारे येणारे उत्पन्न कोणते, याची गणना केली पाहिजे. त्यात पगारातून मिळणारे उत्पन्न, हाऊस प्रॉपर्टी, व्यवसायातून मिळणारा नफा, कॅपिटल गेन यांच्यातील फायदा आणि तोट्याची मोजणी केली पाहिजे. त्यासाठी खालील माहिती गोळा करायला हवी.
* फॉर्म 16- तुम्ही नोकरदार असाल, तर फॉर्म 16 द्वारा तुम्हाला आयकर भरावा लागेल. त्यात तुम्हाला पगारातून मिळणारे उत्पन्न आणि त्यातून टी.डी.एस. कापला जात असेल, तर त्याची माहिती द्यावी लागेल.
व्याज सर्टिफिकेट-तुम्ही गृह कर्ज घेतले असेल, तर त्या वर्षात फेडलेल्या व्याजाचे सर्टिफिकेट संबंधित बँकेकडून घ्यावे लागेल.
कॅपीटल गेन – कलम 54 , 54 बी, 54 डी, 54 इसी, 54 एफ, 54 जी, 54 जीए अंतर्गत कॅपीटल गेनसाठी गुंतवणूक केली असेल, तर त्याची माहिती आणि कागदपत्रे गोळा करून ठेवावीत.
अन्य स्रोत- याशिवाय फिक्स डिपॉझिट, एनएससी, केवीपी, डिव्हिडंड अशा स्रोतांतून काही मिळकत होत असेल किंवा 18 वर्षांखालील मुलांद्वारे काही मिळकत येत असेल, तर त्याचाही समावेश तुमच्या मिळकतीत करावा लागेल.
आता आयकराच्या 80 कलमाखाली आयकरात कोणत्या विविध सवलती मिळतात, याकडे एक नजर टाकूया.
कलम 80 सी, 80 सीसीसी आणि 80 सीसीडी अंतर्गत व्यक्तिगत करदात्याला बचतीवर करात सवलत मिळू शकते. यात अनुमोदीत गुंतवणूक, अंशदान, खर्च, हाउसिंग लोन रिपेमेंट अशा सवलती मिळू शकतात. जर तुम्ही या वित्तीय वर्षात इपीएफ, पीपीएफमध्ये अंशदान, एनएससी, टॅक्स सेव्हिंग एफडी/ बॉन्ड /इन्शुरन्स प्रीमियम/ इएलएसएस किंवा युलीप यात गुंतवणूक केली असेल, तर संबंधित कागदपत्र गोळा करून ठेवावीत. त्याचप्रमाणे तुमच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चातील ट्यूशन फी किंवा घर खरेदी केले असेल, तर त्यावर भरलेली स्टँप ड्युटी अशा कागदपत्रांचीही जमवाजमव करून ठेवावी. 80 सीसीएफद्वारे कोणत्या बाँंडमध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्याची माहिती गोळा करावी.
याशिवाय 80 डी अंतर्गत स्वत:चा / पत्नीचा / कुटुंबाचा मेडिक्लेम विमा काढला असेल, तर त्याच्या पावत्याही गोळा कराव्यात. 80 ईअंतर्गत शैक्षणिक कर्ज घेतले असेल, तर त्याच्या व्याजाची कागदपत्रेही तयार ठेवावीत. त्याचप्रमाणे 80 जी, 80 जीजीए, 80 जीजीसीअंतर्गत कोणती रक्कम दान म्हणून दिली असेल, तर त्याची पावतीही काढून ठेवावी.
तुमच्याकडून कोणत्याही स्वरूपाचा टीडीएस कापला गेला असेल, तर त्याचे सर्टिफिकेट घेऊन ठेवावे. या वित्तीय वर्षात तुम्ही कोणत्याही प्रकारचा अॅडव्हान्स टॅक्स भरला असेल, तर त्याची माहिती गोळा करून ठेवावी.
वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नावर जसे की, सिक्युरिटीवर लाँग टर्म कॅपिटल गेन, डिव्हिडंड याचा उल्लेख विवरणपत्रात करावा लागतो. त्याची कागदपत्रेही गोळा करून ठेवावी लागतात.
तुम्ही टॅक्स रिफंडद्वारा प्राप्त करून घेऊ इच्छित असाल, तर तुमच्या बँकेच्या डिटेलशिवाय एमआयसीआर नंबर द्यावा लागतो. तो बँकेकडून प्राप्त करून घ्यावा लागतो.
ही वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा केल्यानंतर तुमचे उत्पन्न किती, याची मोजणी करता येईल. त्यानुसार तुम्ही कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये येता त्याप्रमाणे त्यावर टॅक्सची गणती करता येईल.
हे सगळं तुम्हाला स्वत:ला करणे अवघड वाटत असेल, तर टॅक्स कन्सलन्टंटची मदत घेता येईलय मात्र त्यासाठी लागणारी विविध कागदपत्रं आधीपासून तयार ठेवली तर ऐनवेळची धावपळ नक्कीच वाचवता येईल.
जगदीश काळे