जैविक युद्धाशी लढा देणारे डॉक्टर्स खरे वैद्यकीय सैनिक : डॉ. प्रतापसिंह जाधव

जैविक युद्धाशी लढा देणारे डॉक्टर्स खरे वैद्यकीय सैनिक : डॉ. प्रतापसिंह जाधव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : आधुनिक जगातील वैद्यकीय सुविधा या ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे प्रगत झाल्या असून, रोबोटिक सांधेरोपण हे रुग्णांना मिळालेले वरदान आहे, असे उद्गार दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी काढले. भविष्यात आण्विक युद्धाशी सीमेवरील जवान लढा देतील; पण जैविक युद्धाशी लढा देणारे डॉक्टर्स हे खरे वैद्यकीय सैनिक असणार आहेत, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले. नॉर्थस्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पहिल्या रोबोटिक सांधेरोपण मशिनच्या अनावरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ वैद्यकीय अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. जी. एस. कुलकुर्णी, माजी खासदार संभाजीराजे, मुख्यमंत्री साहाय्यता कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, डॉ. दीपक जोशी, डॉ. सचिन फिरके, श्रीमती विदुला जोशी प्रमुख उपस्थित होते.

भारत देशाने जगाला आयुर्वेद व योगा दिल्याचे सांगून डॉ. जाधव म्हणाले, आज वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. भारतीय तरुण 'इस्रो'पासून 'नासा'पर्यंत आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. प्रत्येक देशात वैद्यकीय सुविधाही भारतीयांच्या हातात आहे. आधुनिक सुविधांमुळे आयुर्मान वाढले आहे. 1947 मध्ये सरासरी आयुर्मान 32 होते. आज तेच आयुर्मान सरासरी 70 वयापर्यंत गेले आहे. अमेरिकेतील वैद्यकीयशास्त्र अधिक प्रगत आहे. मोबाईल हेल्थ, टेली हेल्थ केअर, टेली केअर, हेल्थ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व बिग डेटाद्वारे सगळी माहिती सर्व्हरमध्ये फीड केली जाते. घरात एखाद्या व्यक्तीला नेमका काय त्रास होत आहे, हे तेथील डॉक्टरना तत्काळ समजते. स्मार्ट वॉचमुळे किती अंतर आपण चाललो, ईसीजी, पल्स रेटची माहिती तत्काळ कळते, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.
अन्य देशांच्या तुलनेत वैद्यकीय सेवेवरील आपल्या देशाचा खर्च कमी असल्याचा संदर्भ देऊन डॉ. जाधव म्हणाले, भारत सरकार वैद्यकीय सुविधेसाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ 2.1 टक्के इतक्या निधीची तरतूद करते. याउलट अमेरिका 19 टक्के, युरोप राष्ट्रे 7 टक्के, तर लहान राष्ट्रे 3 ते 4 टक्के तरतूद करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, आज भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. प्रत्येक एक हजार भारतीयांमागे एका डॉक्टरची गरज आहे. यानुसार 1 कोटी 40 लाख डॉक्टर पाहिजेत. 2030 पर्यंत भारताला अजून 20 लाख डॉक्टरांची गरज आहे. यासाठी तरुण पिढीने या क्षेत्राकडे अधिक वळावे. कोरोनामुळे जगण्याची संकल्पना बदलली आहे. कोरोना वॉरिअर्स म्हणून डॉक्टरनी चांगले काम केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरातील ज्या ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्कार केला, ते खर्‍या अर्थाने समाजाचे मार्गदर्शक व कोल्हापूर भूषण आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूरचा स्वकर्तृत्वावर विकास

पुण्या-मुंबईच्या तुलनेत कोल्हापूरला वैद्यकीय सुविधा कमी आहेत. काही सुविधा ठाणे, तर काही नागपूरला गेल्या असतील. दुर्दैवाने कोल्हापूरला कोणी वाली नाही, म्हणून इकडे काही येत नाही. मेट्रो सिटीमध्येही कोल्हापूरचा समावेश नाही. आजपर्यंत कोल्हापूरचा विकास कोणत्याही शासनाच्या मेहरबानीवर नाही, तर फक्त शाहू महाराजांनी व कोल्हापूरच्या जनतेने स्वकर्तृत्वावर केला असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

माजी खासदार संभाजीराजे म्हणाले, रोबोटिक सांधेरोपणाचा पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना फायदा होणार आहे. जसा रोबो अचूक पद्धतीने न चुकता शस्त्रक्रिया करतो तसेच आजच्या राजकारण्यांनाही रोबोची गरज आहे. ते कुठे चुकतात हे दाखवून देणार्‍या रोबोची गरज आहे.
मुख्यमंत्री साहाय्यता निधी विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी राज्यात मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याचे सांगितले. गुडघा, लिव्हर, किडनी प्रत्यारोपणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

स्वागतपर भाषणात डॉ. दीपक जोशी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिले रोबोटिक सांधेरोपण मशिन असल्याचे सांगितले. नॉर्थस्टार हॉस्पिटलमध्ये कै. डॉ. मा. ना. जोशी फाऊंडेशनच्या माध्यमातून माफक दरात रुग्णसेवा उपलब्ध करून दिली जात आहे. डॉक्टरांकडून होणार्‍या शस्त्रक्रिया या 95 टक्के अचूक असतात; पण रोबोटिक मशिनमुळे शंभर टक्के शस्त्रक्रिया यशस्वी होणार असल्याचे ते म्हणाले. या रोबोटिक मशिनची माहिती डॉ. सचिन फिरके यांनी दिली. यावेळी डॉ. जी. एस. कुलकर्णी यांचे 'हेल्थ, फिटनेस व रिटायरमेंट' या विषयावर व्याख्यान झाले. सौ. शिल्पा जोशी यांनी आभार मानले.

सियाचीन हॉस्पिटल ही 'पुढारी'ची विधायक पत्रकारिता

दररोज टी.व्ही. लावला की, कोण कोणाला काय बोलले, हेच पाहायला मिळते. तुम्हाला बुद्धी येवो; पण शिव्या देऊन तरुण मुलांवर संस्कार घडवू नका, असा सल्ला डॉ. जाधव यांनी दिला. विकासकामांवर बोला. पत्रकारिता ही विध्वंसक व दुसरी विधायक पत्रकारिता असते. दै. 'पुढारी'ने सियाचीन हॉस्पिटल उभारून विधायक पत्रकारिता केली. तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे दै. 'पुढारी' व कोल्हापूरच्या जनतेने सियाचीन हे 22 हजार फुटांवर बांधलेले पहिले हॉस्पिटल आहे. आजही गेली 22 वर्षे येथे सैनिकांना आधुनिक वैद्यकीय यंत्रणा दै. 'पुढारी'मार्फत पुरवली जात आहे, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news