बंगळूर; पुढारी ऑनलाईन : भावी पत्नीचे न्यूड फोटो त्याच्या मित्रांसोबत शेअर करणे आणि ते सोशल मीडियावर अपलोड करणे एका २७ वर्षीय डॉक्टरला महागात पडले आहे. यामुळेच भावी पत्नीने तिच्या तीन मित्रांना सोबत घेऊन डॉक्टराचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळूरमधील ही घटना आहे.
बंगळूर येथे राहणाऱ्या चेन्नई येथील डॉ. विकास राजन याला १० सप्टेंबरच्या मध्यरात्री एक महिला आणि तिचे दोन मित्र सुशील आणि गौतम यांनी मारहाण केली होती. या प्रकरणातील आणखी एका संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. सर्व संशयित पेशाने आर्किटेक्ट्स आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासने युक्रेनमध्ये एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले आणि त्याने बंगळूरला येण्यापूर्वी दोन वर्षे चेन्नईमध्ये प्रॅक्टिस केली. बंगळूर शहरातील बेगूरजवळील न्यू मायको लेआउट येथील संशयित सुशीलच्या घरी डॉक्टरला मारहाण करण्याची घडली आहे. या मारहाणीत डॉ. विकास गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान १४ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. विकासचा मोठा भाऊ विजय याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, विकास हा एका महिलेसोबत दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. त्याच्या कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला होता. पण विकासने कथितरित्या सोशल मीडियावर त्याच्या एका मैत्रिणीचे नाव वापरून अकाउंट उघडले आणि भावी पत्नीचे न्यूड फोटो अपलोड केले. हे त्याने तमिळनाडूतील काही मित्रांसोबतही शेअर केले.
८ सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर तिचे न्यूड फोटो पाहून महिलेला धक्काच बसला. तिने याबाबत विकासला जाब विचारला. त्याने हे केवळ गंमत म्हणून केल्याचे कारण दिले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. ही गोष्ट महिलेने तिच्या वर्गमित्रांना सांगितली. त्यानंतर त्यांनी त्याला धडा शिकविण्याचे ठरवले.
त्यानुसार महिलेने १० सप्टेंबर रोजी विकासला सुशीलच्या घरी बोलावून नेले. संशयितांनी त्याच्यावर पाण्याच्या बाटल्या आणि हाताने मारहाण केली. विकासला ठार मारण्याचा त्यांचा हेतू नव्हता. तो मारहाणीत बेशुद्ध पडल्याने त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. महिलेने विकासच्या भावाला सांगितले की ती विकाससोबत तिच्या मित्राच्या घरी गेली होती आणि फोन कॉल अटेंड करण्यासाठी ती घराबाहेर पडली. तेव्हा तिच्या मित्रांनी विकासशी भांडण सुरू केले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला.
पोलिस तपासात तिच्या सांगण्यावरूनच तिच्या मित्रांनी विकासवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या मित्रांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा :