नसरापूर; पुढारी वृत्तसेवा : निर्णय प्रक्रियेमध्ये येण्यासाठी महिलांना आरक्षण दिले गेले. त्यामुळेच महिला सरपंचाची संख्या आज लक्षणीय आहे. आमच्यापेक्षा सरपंचांना मोठे अधिकार आणि ताकद असल्याचे सांगत आपल्या गावासाठी जे योग्य आहे ते सर्वांना विश्वासात घेऊन करा. सरपंचांनी जबाबदारीने विकासकामे करावीत, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धांगवडी, (ता. भोर) येथे माजी जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, दूध संघाचे संचालक भगवान पासलकर, प्रकाश तनपुरे, संतोष चाकणकर, तानाजी मांगडे, यशवंत डाळ, नितीन धारणे, गणेश निगडे, वंदना धुमाळ, विद्या यादव, विठ्ठल शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, राज्यातील इडी सरकारकडून महिलांची नावे घेऊन गलिच्छ राजकारण केले जात आहे. त्यांचे लोक महापुरुष व महिलांबाबतीत अवमानकारक वक्तव्ये करीत आहेत. चिखलफेक व उणीदुणी काढण्यात वेळ घालवत आहे. इडी सरकारकडून आगामी निवडणुका प्रलंबित ठेवल्या जात असल्याचा आरोप सुळे यांनी केला. माजी सभापती सुनीता बाठे, सरपंच सचिन तनपुरे यांच्या हस्ते सुळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रदीप गारटकर, मानसिंग धुमाळ, निर्मला जागडे, किरण राऊत, भारती शेवाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.