Tulsi Vivah 2023 : तुळशी विवाह कसा करावा? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

Tulsi Vivah
Tulsi Vivah

तुळस ही एक पूजनीय वनस्पती आहे. हिचे झाड दोन तीन हात वाढते. काळी व पांढरी अशा हिच्या दोन जाती आहेत. त्या म्हणजेच कृष्ण तुळस व राम तुळस होय. तुळशीला उभ्या मंजिरी येतात. (Tulsi Vivah 2023 ) या मंजिरीतच तुळशीची बारीक अतिशय कोमल निळ्या रंगाची सुंदर फुलं असतात. हिचे मूळ नाव तुळस असावे आणि तुलसी हे त्या नावाचे संस्कृतीकरण असावे. असे व्युत्पत्तीकोशात म्हटले आहे. नावाचे संस्कृतीकरण झाल्यावर तुलसी शब्दाच्या व्युत्पत्त्या देण्याचाही प्रयत्न झाला आहे. ब्रम्हवैवर्त पुराणातील ही व्युत्पत्ती पाहा. (Tulsi Vivah 2023 )

नरा नर्यश्च तां दृष्ट्वा तुलनां दातुमक्षमा:
तेन नाम्ना च तुलसीं तां वदन्ति पुराविद:॥ ( ब्र. वै. प्रकृतिखंड 15)

अर्थ – नरनारींनी त्या वनस्पतीला पाहिले आणि त्यांना तिची कोणत्याही वनस्पतीशी तुलना करता येईना. म्हणून पुरातत्त्ववेत्ते तुलसी या नावाने तिला संबोधू लागले.

तुलसीच्या पौराणिक व लोककथात्मक उत्पत्तीकथा अशा आहेत…

1) समुद्र मंथनाच्यावेळी त्यातून जे अमृत निघाले, त्याचे काही थेंब जमिनीवर सांडले व त्यातून तुळस निघाली आणि पुढे ती ब्रह्मदेवाने विष्णूला दिली (स्कं.पु.248).

2) धर्मध्वज नावाचा राजा होता. माधवी नावाची त्याची पत्नी होती. या दाम्पत्याला एक मुलगी झाली. ती अतिशय सुंदर होती, म्हणून लोक तिला तुलसी म्हणू लागले. तिने बदरीवनात विष्णूच्या प्राप्तीसाठी तप केले. त्यावेळी तिला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ती ब्रह्मदेवांना म्हणाली – 'पूर्वजन्मी मी तुलसी नावाची गोपी असून, कृष्णाची प्रिय सखी होते. एके दिवशी मी कृष्णाच्या सहवासाचे सुख भोगीत असता राधेने मला पाहिले व मत्सरग्रस्त होऊन शाप दिला, की तू मानवयोनीत जन्म घेशील.' कृष्णाला त्या शापाबद्दल वाईट वाटले. ते म्हणाले, 'भिऊ नकोस. त्या मानव जन्मातही तुला माझी प्राप्ती होईल.' तुलसीच्या तोंडून ही हकिगत ऐकल्यावर ब्रह्मदेव तिला म्हणाले, 'या मानवजन्मात तुला विष्णूची प्राप्ती होईल; पण त्याआधी तूला शंखचूड दैत्याची पत्नी व्हावी लागेल. तो दैत्यही पूर्वजन्मीचा एक गोपच असून राधेच्या शापामुळेच दैत्यजन्म प्राप्त झाला आहे. पूर्वजन्मी त्याचे तुझ्यावर प्रेम होते. ते या जन्मी तू सफल कर.'

वेदमूर्ती जयंत फडके गुरूजी
वेदमूर्ती जयंत फडके गुरूजी

मग ब्रह्मदेवाने तुलसीला षोडशाक्षरी राधिकामंत्र उपदेशून त्याचे पुरश्चरण करण्यास सांगितले. तुलसीने तसे केले. मग एके दिवशी तीला शंखचूड भेटला. त्याने गांधर्वविधीने तुलसीचे पाणिग्रहण केले. दोघांनी बराच काळ संसार सुख उपभोगले. पुढे तो दैत्य माजला. त्याने देवलोकावर स्वारी केली. देव पराजित झाले. त्यांनी शंकराकडे जाऊन आपले गार्‍हाणे सांगितले. ते ऐकताच शंकर शंखचूडाचे पारिपत्य करायला निघाले. त्या दोघात तुंबळ युद्ध झाले. पण शंखचूड काकेल्या मरेना. कारण तुलसीच्या पतिव्रत्त्याच्या प्रभावाने तो अजिंक्य व अमर ठरला होता. मग विष्णूंनी कपट केले. ते

शंखचूडाचे रूप घेऊन तुलसीकडे गेले. आपला पती विजय मिळवून परत आला असे समजून तुलसी त्याच्याशी रममाण झाली. पण थोड्याच वेळात तिला कळले, की जवळ आहे तो आपला पती नव्हे. मग ती त्याला म्हणाली, 'माझ्या पतीचे रूप घेऊन आलेला तू कोण आहेस ते मला सांग.' विष्णूने तिला आपले नाव सांगितले. त्यावर तुलसीने विष्णूला शाप दिला, की 'तू पाषाण रूप होशील.' त्यावर विष्णू तिला म्हणाले, 'तू माझ्या प्राप्तीसाठी तप केले होतेस, म्हणून मी शंखचूडाच्या रूपाने तुझ्याशी सहगमन केले. या पुढे तुला दिव्य देह मिळेल आणि तू मला लक्ष्मीइतकीच प्रिय होशील. तुझ्या या तडकलेल्या शरिरातून गंडकी नावाची नदी निर्माण होईल. तुझ्या केसातून एक झाड उगवेल. त्यालाही लोक तुलसीच म्हणतील व त्याची पूजा करतील. तू मला पाषाण होण्याचा शाप दिलास म्हणून मी गंडकीच्या तीरावरचा शालिग्राम नावाचा पाषाण होईन. त्या पाषाणाला लोक माझे प्रतीक म्हणून पूजतील व त्यावर तुलसी पत्र वाहतील. तुझा पती शंखचूड हा शंखाच्या रूपाने माझ्या पूजेत दाखल होईल.' त्या शंखातून माझ्यावर पाणी घातल्याने मी प्रसन्न होईन.( दे. भा.9; ब्र.वै. पु. प्रकृतिखंड ).

तुलसी विवाहाचा काल अनेक आहेत. पण सामान्यपणे कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात. त्यासाठी विवाहाच्या पूर्व दिवशी तुलसीवृंदावन सारवून, रंगवून ऊस, झेंडू फुलांच्या माळांनी सुशोभित करतात. तुळशीच्या मुळात चिंचा व आवळे ठेवतात. हा विवाहसोहळा बहुधा संध्याकाळी करतात.

श्री विष्णू आषाढ शुद्ध एकादशीला शयन करतात व कार्तिक शुध्द एकादशीला जागे होतात. विष्णूंच्या या जाग्रतीचा जो उत्सव करतात, त्याला प्रबोधोत्सव असे नाव आहे. हा प्रबोधोत्सव व तुलसी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. त्याचा धार्मिक विधी असा आहे.

कर्त्याने स्नान करून सोवळे किंवा धूत वस्र नेसावे. बाळकृष्णाच्या मूर्तीसह तुळशीची स्नान या उपचारापर्यंत पूजा करावी. नंतर मंगल वाद्ये वाजवत बाळकृष्णाला व तुळशीला तेल हळद लावावी. दोघांनाही उष्णोदकाने मंगलस्नान घालावे. नंतर बाळकृष्णास वस्र, यज्ञोपवित इ. उपचार व तुळशीला हळद, कुंकू, मंगळसूत्र इ. उपचार समर्पण करावेत. नंतर घंटादी वाद्यांचा गजर करून, 'यो जागरतमृचः कामयन्ते । ' इ. मंत्रांनी देवाला जागे करावे. त्यानंतर हे पौराणिक मंत्र म्हणावे,

ब्रह्मेन्द्ररुद्राग्निकुबेरसूर्यसोमादिभिर्वन्दित वन्दनीय ।
बुध्यस्व देवेश जगन्निवास मंत्रप्रभावेण सुखेन देव ॥
इयं तु द्वादशी देव प्रबोधार्थ विनिर्मिता ।
त्वयैव सर्वलोकानां हितार्थं शेषशायिना ॥
उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद त्यज निद्रां जगत्पते ।
त्वयि सुप्ते जगन्नाथ जगत्सुप्तं भवेदिदम् ॥
उत्थिते चेष्टते सर्वमुत्तिष्ठोत्तिष्ठ माधव ।
गता मेधा वियच्चैव निर्मलं निर्मला दिशः ।
शारदानि च पुष्पाणि गृहाण मम केशव ॥

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news