भाऊबीज : समर्पित सण

भाऊबीज : समर्पित सण

भाऊबीज म्हणजेच यमद्वितीया. या दिवशी यम देवता आपल्या बहिणीकडे म्हणजे यमुनेकडे जेवायला गेली, त्याची आठवण म्हणून त्या दिवसाला यमद्वितीया असे नाव पडले. या दिवशी भावाने बहिणीकडे जेवायला जाऊन तिला वस्त्र, अलंकार अशी एखादी भेट देण्याची प्रथा आजही पाळली जाते. जुन्या कथेनुसार बहिणीने भावाचे रक्षण केले म्हणून भावाने तिला ओवाळणी घालण्याची पद्धत सुरू झाली. यमद्वितीयेच्या दिवशी नरकात खितपत पडलेल्या जीवांना एक दिवसापूर्वी मोकळीक मिळते, अशी श्रद्धा आहे.

यमद्वितीया आणि गोवत्सद्वादशी हे दोन वेगळे सण आहेत. पण ते दिवाळीला इतके लागून येतात की, त्यांचा समावेश दिवाळी उत्सवातच केला गेला. यमद्वितीया हे एक व्रतदेखील असून त्या दिवशी यमधर्म, यमदूत, यमुना, चित्रगुप्त, मार्कंडेय आणि पितर अशा सर्वांची पूजा करावयाची असते.

यम ही एक वैदिक देवता आहे. तो मूत्यूरूप आहे. यमाचे काम आणि त्याचे सामर्थ्य वर्णन करणार्‍या अनेक ऋचा ऋग्वेदात आहेत. यमाच्याच सह पितर राहतात, पूर्वज ज्या गमनमार्गाने गेले, तो मार्ग यम जाणतो आणि अग्नी हा यमाचा प्रतिनिधी अहे, असे विचार वैदिक साहित्यात आढळतात. वेदानंतरच्या काळात यमाचे रूप कठोर न्यायाधीश म्हणून मानले जाऊ लागले. काही निसर्गवादी जुन्या पंडितांनी यम हे मावळत्या सूर्याचे प्रतीक आणि विवस्नान हा यमाचा पिता उगवत्या सूर्याचे प्रतीक म्हणून मानला तर काहीजणांना यम हा सूर्यास्ताचा आणि यमी ही त्याची जुळी बहीण रात्रीचा प्रतिनिधी असल्याची कल्पना मांडली. देवतामूर्तीप्रकरणम् नावाच्या ग्रंथात यमाची मूर्ती कशी असावी याचे वर्णन आहे ते असे,

'लेखणी पुस्तंक धत्ते कुक्कुटं दण्डमेव च!
महामहिषमारूढ : कृष्णाड्गशच यमो भवेत् !!'

'यममूर्ती निर्माण करताना त्याच्या हातात लेखणी व पुस्तक दाखवावे. तसेच तो कोंबडा व दंड धारण करणारा असतो. मोठ्या रेड्यावर बसलेला असतो आणि त्याचा वर्ण काळा असतो'

विष्णूधर्मोत्तर पुराणात यममूर्तीजवळ, हातात लेखणी आणि भूर्जपत्र घेऊन यमाच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या चित्रगुप्ताचे वर्णन आढळते. चित्रगुप्त हेही एक गंभीर प्रतीकच आहे. जीवमात्रांच्या पाप-पुण्याचा हिशेब ठेवणारा चित्रगुप्त यमाच्या दरबारातील मोठा अधिकारी आहे. यमलोकाजवळ चित्रलोक असतो, असा पौराणिक उल्लेख आहे. मृत्यूदेवतेचे दूत ते यमदूत होय. यमुना ही पवित्र नदी आणि यमाची बहीण, कलिंद पर्वतातून तिचा उगम झाला म्हणून ती कालिंदी. पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भावरून दिसते की, यमुनेचा प्रवाह निरनिराळ्या वेळी बदलत राहिला. मानवी रूपातील यमुनेची अनेक देखणी शिल्पे आढळतात. यमुना ही कुर्मावर आरूढ दाखवली जाते. कृष्णचरित्रात यमुनेला असाधारण महत्त्व आहे. नंददास नावाच्या कृष्णभक्त कवीने म्हटले आहे,

'सब दिन का मनमोहन हरत
सो प्रिय को मन ए जो हरणी!
इन विना एक क्षण रहे न
जीवन धन्य ब्रजचन्द्र मन आनंदी करणी!!'

'मनमोहन कृष्ण सर्वांची मने हरण करतो; तर यमुना कृष्णाचे मन हरण करते. कृष्ण एक क्षणदेखील तिचा वियोग सहन करू शकत नाही.'
अशा प्रकारे दीपावलीच्या उत्सवात विविध नात्यांचे पावित्र्य, गांभीर्य, आधार आणि आनंद जपण्याचा उद्देश दिसतो. वर्तमानकाळासह वेळोवेळी भूतकाळाचे म्हणजे पितरांचे स्मरण दिसते. आकाशदिव्याच्या स्थापनेपासून याचे पडसाद दिसतात. विशेषतः अष्टदलाकृती दिव्याचे महत्त्व दिसते. त्याखाली काढलेल्या अष्टदलाकृती कमळात धर्म, हर, भूती, दामोदर, धर्मराज, प्रजापती, पितर आणि प्रेत यांच्या आदरार्थ आठ दिवे लावण्याची प्रथा प्राचीन काळात होती.

अमावस्येच्या दिवशी महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या पूजेसाठी शाईची दौत, रुपया आणि वही ही प्रतीके ठेवली जातात. यक्षराजी, दीपावली उत्सव, दीप प्रतिपदुत्सव, दीपमाला उत्सव, दीपोत्सव अशा विविध शब्दांनी संस्कृत वाङ्मयात दीपावलीचा उल्लेख दिसतो आणि सर्व मराठी लोकांच्या चिरपरिचयाचा 'दिवाळी' हा शब्द प्रचलित झालेला दिसतो तो इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून! श्रीपती नावाच्या ज्योतिषाचार्यांनी आपल्या 'ज्योतिषरत्नमाला' नावाच्या ग्रंथावरील मराठी टीकेत 'दिवाळ' हा शब्द योजला. सार्‍यांची मने आणि घरे प्रसन्न पणतीतील दीपकळ्यांनी उजळून टाकणारा दिवाळी हा सण लौकिक आणि पारलौकिक आकांक्षांना व्यक्त करणारा मोठा उत्सव होय!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news