सरकार गेले, पक्ष गेले; दोघांचेही वाटोळे झाले : राधाकृष्ण विखे पाटील
नगर : पुढारी वृत्तसेवा : सभापती राहुल नार्वेकर यांनी ऐतिहासिक निर्णय दिला. शिंदे सेना हीच बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना ठरली. 'त्यांना' पक्ष वाचवता आला नाही. ज्येष्ठ नेते स्वतःला जाणता राजा समजतात. त्यांच्या माध्यमातून कटपुतळीसारखे नाचतात. सरकार गेले, पक्ष गेले. एकमेकांना सल्ला देता देता दोघांचेही वाटोळे झाले. आता शिल्लक काय?, असे सवाल करून महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांना नाव न घेता सडकून टीका केली.
महायुतीच्या संकल्प महाविजय 2024 कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत गुरुवारी विखे बोलत होते. भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राज्य सरचिटणीस अरुण मुंडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अॅड. विवेक नाईक, प्रिया जानवे, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहराध्यक्ष दिलीप सातपुते, बाबूशेठ टायरवाले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्यासह भाजप, रिपाइं, रासप, राष्ट्रवादी, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले, की कालचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारला मजबुती देणारा आहे. शिवसेनेचे खरे वारसदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.
सध्या राज्यात ज्योतिषांची संख्या वाढली
हे दररोज नवीन भविष्य सांगतात. आज सरकार पडणार, 10, 15 तारखेला सरकार पडणार.. याचा कंटाळा आला होता. सकाळी टीव्ही लावला की नको त्याचे तोंड पाहावे लागते. त्यांच्या वाचाळपणामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची उरलीसुरली अब्रू घालवली.
सत्तेत असताना ठाकरे कधी मंत्रालयात आले नाहीत. ते सोशल मिडीयावरच होते. आता सुनावणी सुरू असताना ते एकही दिवस विधानसभा सभापतीसमोर आले नाहीत. या वेळी आगरकर, टायरवाले, गायकवाड, मुंंडे, जगताप, साळवे आदींनी मनोगत व्यक्त केले.
बाळासाहेब महाडिक यांनी सूत्रसंचालन केले.
आ. रोहित पवारांवर कारवाई करणार : विखे
बोलण्याचे सर्वांना स्वातंत्र्य आहे. पण बेछूट व बेताल आरोप करण्याच्या काही परिसीमा आहेत. त्यांना माझे आव्हान आहे, की तलाठी भरतीत कोठे भ्रष्टाचार झाला आहे? तीस लाख रुपये घेतल्याचे जाहीर सभेत आरोप केले आहेत. म्हणून सर्व कागदपत्रे घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे. आम्ही पूर्ण पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेतली आहे. आमदार रोहित पवार यांच्यावर सध्या ईडीची कारवाई सुरू आहे. त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत, असेही पालकमंत्री विखे पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
तिकडे एकत्र, इकडे विसंवाद!
प्रदेश पातळीवर महायुतीला सर्व घटक पक्षांचे नेते एक दिसतात. मात्र, स्थानिक पातळीवर समन्वय नाही, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यावर विखे पाटील म्हणाले, की पदाधिकार्यांनी व्यक्त केलेल्या भावना खर्या आहेत. प्रदेश पातळीवर नेते एकत्र दिसतात. मात्र, स्थानिक पातळीवर पदाधिकार्यांमध्ये विसंवाद आहे. तो विसंवाद आपल्याला संपवायचा आहे. त्यासाठी 14 जानेवारीला मेळाव्याचे आयोजन केले आहे.
घटक पक्षांची दांडी
भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी, रिपाइं (आठवले गट) यांचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, फलकावर रिपाइं (कवाडे गट), रासप, शिवसंग्राम, जनसुराज्य शक्ती, प्रहार जनशक्ती याही घटक पक्षांची नावे होती. मात्र या पक्षांचे कोणीही मेळाव्याला उपस्थित नव्हते.
कार्यकर्त्यांचे कान टोचले
केंद्र सरकार विविध योजना राबवीत आहे. मात्र, त्याची माहिती जनतेपर्यंत जात नाही. एकाही कार्यकत्याने गावात फलक लावला नाही. केवळ केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्याचा बोभाटा होत आहे. कार्यकर्त्यांनी सरकारच्या कामाचे फलक गावात लावले पाहिजेत. गावपातळीवर निवडणुका लढविल्या पाहिजेत, असे सांगून विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.