मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांना अपात्र करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांनी अमान्य केल्याने शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालात त्रुटी असून, तो रद्द करावा. तसेच पक्षविरोधी कारवाई करणार्या आमदारांना अपात्र करावे, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी दाखल केली आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर बहुमत चाचणीवेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा 'व्हिप' सर्व आमदारांना गोगावले यांनी बजावला होता. त्यावेळी ठाकरेंसोबत असलेल्या 14 आमदारांनी यावेळी सरकारच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे पक्षाच्या 'व्हिप'चे उल्लंघन केल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे संबंधित 14 आमदारांना अपात्र करावे, अशी मागणी केली होती.
विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना हा पक्ष शिंदे यांचा असल्यावर शिक्कामोर्तब केले. परंतु, अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र करण्यास मात्र नकार दिला. आता अध्यक्षांच्या या निर्णयात त्रुटी असून, तो रद्द करावा. तसेच संबंधित आमदारांना अपात्र करावे, अशी मागणी करणारी 645 पानांची याचिका गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.