कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या (gokul dudh sangh) निवडणुकीपूर्वी मल्टीस्टेट आणि नाकारण्यात येणारे वासाचे दुध हे दोन मुद्दे गाजले होते. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मल्टीस्टेटचा प्रस्ताव मागे घेतला. त्यानंतर गोकुळकडून कोणतेही कारण न सांगता नाकारण्यात येणारे वासाचे दूध हा प्रचाराचा एक महत्त्वाचा मुद्दा होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात एक रुपयाही आला नाही. याचप्रमाणे निवडणुकीतील आश्वासने ही निवडणुकीपुरती असतात, असा घरचा आहेर ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
गोकुळ दूध संघाची (gokul dudh sangh) २४ सप्टेंबर रोजी ऑनलाईन सर्वसाधारण सभा होत आहे. सभेपुढे ३२४ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. याबाबत तपशीलवार माहिती आणि खुलासा देण्यासाठी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्यासह संचालकांनी मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
वासाच्या दुधाचे प्रमाण किती आहे आणि वासाच्या दुधाचा थेट लाभ संस्थेला किंवा संबंधित दूध उत्पादकाला मिळत नाही. या प्रश्नावर ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले, यापूर्वीही वासाच्या दुधाचे प्रमाण पॉईंट टक्के इतकेच होते, आणि आताही त्यात फरक पडलेला नाही. पूर्वी ज्या प्रमाणात वासाचे दूध नाकारले जायचे तेच आता ही आहे. या नाकारलेल्या वासाच्या दुधाचे इतर उपपदार्थ केले जातात. त्याचा लाभांश रूपाने सर्व संस्थांना समान वाटप केले जाते.
मागील सत्ताधारी दोन ते तीन टक्के इतक्या प्रमाणात वासाचे दूध नाकारून शेतकऱ्याचे नुकसान करत असल्याचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केला होता. पंरतु सत्तेवर आल्यावर सत्ताधारी नेत्यांनी यात कोणताही बदल केला नसल्याचे डोंगळे म्हणाले.
यावर पुढे बोलताना अरुण डोंगळे म्हणाले, मागील संचालक मंडळातील नेते संघाच्या दैनंदिन कारभारात फारसे लक्ष देत नव्हते. त्यामुळे त्यांना दैनंदिन कामकाजाची माहिती होत नव्हती. आणि आत्ताचे आमचे नेते दूध संघाच्या कारभाराबाबत नवीन आहेत. त्यामुळे वासाच्या दुधाच्या प्रमाण सांगण्यात गैरमेळ झाला असावा.
नरेंद्र मोदी यांनी १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा होतील, असे निवडणुकीत आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. निवडणुकीतील आश्वासने ही निवडणुकीपुरतीच असतात अशी मिश्किल टिप्पणीही डोंगळे यांनी केली.