Dilip Walse Patil : शरद पवारांबद्दल चुकीचा शब्द जाणे शक्य नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो : दिलीप वळसे-पाटील

Dilip Walse Patil
Dilip Walse Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : "कालच्या माझ्या भाषणात मी कुठेही आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो." असं म्हणत सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी (दि.२०) शरद पवारांवर केलेलल्या टीकेचे स्पष्टीकरण दिले आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण. (Dilip Walse Patil)

शरद पवार यांना कधीही एकहाती सत्ता मिळाली नाही : दिलीप वळसे पाटील

शरद पवार यांच्या उंचीचा राज्यात एकही नेता नाही असं आपण म्हणतो. परंतु राज्यातील जनतेने एकदाही शरद पवार यांना पूर्ण सत्ता दिली नाही. आपण 60-70 आमदारच निवडून आणू शकलो. इतर राज्यांमध्ये अनेक स्थानिक पक्षांनी त्या राज्यात सत्ता मिळवली, अशी टीका सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी केली होती. सध्या अस्तित्वात असलेले दोन्ही राष्ट्रवादी पक्षच असून अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेईल, असेही त्यांनी सांगितले. काही गोष्टी उघडपणे बोलायच्या नसतात. 2019 साली आघाडीला बहुमत मिळाले नाही. परंतु तरीही आपण सत्तेत आलो. सत्तेत आल्यानंतर कोरोनाच्या कालखंडामध्ये दोन वर्षे निघून गेली. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. आपण विरोधी पक्षात गेलो. आपल्या पक्षाच्या अनेक नवीन निवडून आलेल्या आमदारांना कोरोनामुळे निधी देता आला नाही व विरोधी पक्षात गेल्यावर निधी मिळणे कठीण झाले. म्हणून या आमदारांची भूमिका आम्ही शरद पवार यांच्याकडे मांडली. परंतु त्यांनी विरोध केला. म्हणून आपणाला हा निर्णय घ्यावा लागला. आपण भाजपप्रणीत आघाडीत गेलो आहोत. भाजपमध्ये नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या माझ्यावर आरोप केला जातो की ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सची नोटीस आली म्हणून मी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु मला कुठल्याही एजन्सीची नोटीस आलेली नाही. जर कोणाला त्या नोटीस सापडल्या तर त्यांनी त्या माझ्याकडे आणाव्यात. एकही नोटीस आलेली असेल तर मी उद्याच आमदारकीचा राजीनामा देईन. माझ्या द़ृष्टीने मंत्रिपद, मान या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. माझ्यासाठी तालुक्यातील जनतेचे हित महत्त्वाचे आहे, असे वळसे-पाटील म्हणाले होते.

Dilip Walse Patil : चुकीचा शब्द जाणे शक्य नाही

वळसे-पाटील यांनी रविवारी (दि.२०) शरद पवार यांच्याशी संबंधित केलेल्या वक्तव्याचे संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या. आज (दि.२१) त्यांनी ट्विट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "कालच्या माझ्या भाषणात मी कुठेही आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही. माझे म्हणणे असे होते की एवढा मोठा आमचा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. ते घडलं नाही त्याबद्दलची खंत मी काल बोलून दाखवली. ही खंत मी केवळ कालच बोलून दाखवली असे नाही. यापूर्वीही पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये तसेच मेळाव्यांमध्ये जाहीरपणे बोललो आहे. माझ्याकडून आदरणीय पवार साहेबांबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी जे राजकीय विश्लेषण कालच्या भाषणातून कार्यकर्ते व जनतेसमोर मांडले होते, प्रसार माध्यमांनी त्याचा अर्थ समजून न घेता हा विषय चुकीच्या पद्धतीने दाखवला."

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news