धुळे : काँग्रेसच्या तिकीटावर उबाठाने लोकसभा लढवावी – माजी आमदार अनिल गोटे

धुळे : काँग्रेसच्या तिकीटावर उबाठाने लोकसभा लढवावी – माजी आमदार अनिल गोटे

धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी संदर्भात सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. अशा स्थितीत महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने धुळ्याची जागा उद्धव ठाकरे गटाला दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असा दावा लोकसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

धुळ्यात महायुतीच्या वतीने भारतीय जनता पार्टीने खासदार सुभाष भामरे यांना तब्बल तिसऱ्यांदा उमेदवारीची संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीच्यावतीने ही जागा काँग्रेसला दिलेली असल्याने काँग्रेसकडून मात्र अद्यापही कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. किंबहुना काँग्रेसकडे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी यापूर्वीच उमेदवारीसाठी नकार दिला आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकेल, असे नाव महाविकास आघाडी आणि काँग्रेसकडे अद्यापही दिसून येत नसल्याने महाविकास आघाडीच्या गोटात कमालीची शांतता दिसून येत आहे.

या संदर्भात गोटे यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत. भारतीय जनता पक्षाने कुणाला उमेदवारी द्यावी, हा त्यांच्या पक्षाचा अधिकार व विषय आहे. पण दिलेल्या उमेदवाराचा पराभव करण्याची क्षमता असलेला, न झुकणारा आणि न विकला जाणारा उमेदवार उभा करणे ही भाजपा विरूध्द उभा ठाकलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षाची जबाबदारी आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे गणित नाते-गोते व जाती-धर्मावर होते. पण गेल्या दहा वर्षात आपली घोर निराशा झाल्याची भावना भाजपामधील माझ्या जुन्या सहकाऱ्यांची आहे. ही वस्तुस्थिती आता भाजपा नेतृत्वाच्याही लक्षात आली आहे. मतदार संघातील शेतकरी संघटना व भाजपामधील विविध स्थरातील जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठीनंतर व सविस्तर चर्चेनंतरचे आपले मत महाविकास आघाडीच्या नेत्यांना समजावे, यासाठी वस्तुस्थिती मांडत असल्याचा दावा लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात माजी आमदार गोटे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. भाजपा खासदारांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना गैरमार्गाने आर्थिक लाभ मिळवून दिला आहे. सतत फक्त आश्वासनांची खैरात करणे, जाहीरपणे धादांत खोटी आश्वासने देणे, एक दिवसाआड पाणी देण्याच्या वल्गना करणे, विकासाच्या नावावर महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात अकारण हस्तक्षेप करणे, इत्यादी असंख्य तकारींचा पाढाच वाचला जातो. असा दावा देखील गोटे यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी बोरविहिर ते नरडाणा रेल्वे मार्गाचे भूमीपूजन आयोजित करून सदर कार्यक्रमाने मनमाड, मालेगाव, धुळे, शिरपूर, सेंधवा, इंदौर रेल्वे मार्गाचे भुमीपूजन झाल्याची जनतेची फसवणूक केल्याची सामान्य जनतेची आता खात्री झाली आहे. धुळ्याचे खासदार प्रत्यक्ष पंतप्रधानांची दिशाभूल करतात, अशी भावना सर्वच थरात पसरली आहे. असा आरोप देखील गोटे यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आणि होत आहेत. सोयाबीन साडेतीन चार हजार रूपये तर, कापूस ६ ते ८ हजार रूपयांवर येवून ठेपला आहे. कर्जमाफीच्या नावाने बोंबाबोंब आहे. टक्केवारीचा विषय तर, सर्वश्रुत असून चौका-चौकातील चर्चेचा विषय आहे. तिनशे कोटी रूपयांचा खर्च करून आजही धुळे शहराला दररोज घोटभर पिण्यासाठी वणवण करावी लागत आहे.  धुळे जिल्ह्यात एकही नवा उद्योगधंदा आणला नाही. येवू दिला नाही. या बाबतीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये असंतोष असल्याची भावना आहे.

सर्वच थरातील नागरिकांच्या असंतोषाचा लाभ घेण्याची क्षमता आजच्या घडीत फक्त शिवसेना उबाठा मध्येच महाविकास आघाडीची आहे. त्यांनाच लोकसभेच्या निवडणुकीत लाभ होवू शकतो. उध्दव ठाकरे व शरद पवार यांना जनमाणसात सहानभूती मिळत आहे. खरोखर भाजपाचा पराभव करण्याची मनापासूनची धारणा असेल तर, कोणताही प्रतिष्ठेचा विषय न करता धुळे लोकसभेची जागेबद्दल सामंजस्याने मार्ग काढावा. असे आवाहन करून अनिल गोटे पुढे असे म्हणतात की, 'आमदार कुणाल पाटील यांच्यामध्ये भाजपाचा पराभव करण्याची क्षमता होती व आहे. पण त्यांनी माघार घेतल्याने तुल्यबळ लढत होवू शकणार नाही'. असे मत अनिल गोटे यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news